
आम्ही बाळासाहेबांचे विचार बाजूला पडत असताना शांत बसायचे नाही असे ठरविले होते. आम्ही सरकार बदलले. त्यावेळेच्या उठावाची 32 देशांनी नोंद घेतली होती. मला काय मिळेल या पेक्षा समाजाला आपण काय देऊ शकतो याचा विचार आम्ही करतो. सत्ता सोडायला धाडस लागते. मी कधीही कुठला नफा तोटा पाहत नाही, मी विचार पाहतो. मूळ शिवसेनेमुळे आपण लोकसभेत 13 पैकी 7 जागा जिंकल्या असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. गणेश स्पर्धा पुरस्कारचे वितरण त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. ठाण्यात आनंद दिघे यांनी सुरुवातीला गणेश स्पर्धा सुरू केली होती. पूर्वेश सरनाईक यांनी ही स्पर्धा आता सुरू केली आहे. ही स्पर्धा आता जिल्हा निहाय सुरू करा. वकृत्व आणि कर्तुत्व आपल्याला पाहिजे. कर्तुत्व आम्ही दोन वर्षापूर्वी दाखवले आहे असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
मी 24×7 तास काम करतो. कार्यकर्ता म्हणून राहतो, डोक्यात सत्तेची हवा जाऊ देत नाही.मला काय मिळेल यापेक्षा समाजाला काय देऊ हा विचार असतो. मी कधीही कुणाला घाबरलो नाही म्हणून मी माझे काम करत राहणार, पुढे राज्यभर ही स्पर्धा आपण करीत आहोत. आपल्याकडे टॅलेंट आहे पण प्लॅटफॉर्म मिळत नव्हता. मला खूप लोक बोलतात तुमची सोशल मीडिया स्ट्रॉंग नाही. त्यासाठी युवासेनेने मेहनत घेतली पाहिजे असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. आपण 60 कॅबिनेटमध्ये 600 निर्णय घेतले.मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला शपथ घेतली त्यानंतर शेतकऱ्यांसाठी पहिला निर्णय घेतला होता. आम्ही वैयक्तिक निर्णय घेत नाहीत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुपर हिट झाली आहे. तुम्ही ताकद दिली की आम्ही रक्कम वाढविणार आहोत, एकनाथ शिंदे कधी खोटं बोलत नाही असेही ते म्हणाले.
धाडस जे केले ते बोलून केले आहे. आम्ही चार-पाच संधी दिली त्यांनी लाईटली घेतलं. मग आम्ही टाईटली काम केलं. आम्ही पहिले एक दोन वेळेस संधी देतो मग कार्यक्रम करतो.नागपूरमध्ये सुद्धा या लाडकी बहीण योजनेच्या विरोधात काही लोक कोर्टात गेले आहे. सुनील केदार यांचा तो कार्यकर्ता आहे.जे खोडा घालताहेत, त्यांना जोडा मारा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आम्ही लाडका भाऊ योजना सुद्धा आणली आहे.मुलींची फी माफ केली आहे.एसटीत महिलांना 50 टक्के सवलत दिली आहे. एसटी तोट्यात होती ती फायद्यात आली आहे.मुख्यमंत्री वयोश्री देवदर्शन योजना केली आहे, निवडणुकीनंतर विरोधकांना सुद्धा त्याचा फायदा होईल असाही टोला शिंदे यांनी यावेळी लगावला.
शिवाजी महाराज यांची माफी आम्ही 100 वेळा मागू , झालेली घटना दुर्दैवी आहे. त्याचे राजकारण करणे दुर्दैवी आहे. ह्यावर – त्यावर जबाबदारी टाकून राजकारण करू नका. जपानमध्ये कोविड रुग्ण वाढले की आपल्या येथे लॉकडाऊन केले जात होते.वर्षा बंगल्यावर जात असताना कोविड टेस्ट करावी लागत होती.खऱ्या अर्थाने सगळे बंद होते.आपले सरकार स्थापन झाल्यावर सगळे निर्बंध काढले.आतापर्यंत राज्याच्या इतिहासात एवढ्या योजेना झाल्या नव्हत्या. विरोधकांनी बोलताना मर्यादा ठेवली पाहिजे. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले आणि पैशाच्या राशीत लोळणाऱ्यांना लोकांना पैशाची किंमत काय कळेल.मी डॉक्टर नसलो तर अनेकांना ठीक केले आहे.गळ्याचे पट्टे काढले.आज बरेच जण रस्त्यावर चाललेत, बर वाटलं…त्यांनी महापुरामध्ये चालले पाहिजे होते, इरसालवाडी घटनेमध्ये चालले पाहिजे असाही टोमणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी मारला.