Solapur Clash: सोलापुरात काँग्रेस-भाजपचा वाद पेटला! दोन बड्या नेत्यांमध्ये जोरदार राडा; व्हिडिओ व्हायरल, राजकारणात खळबळ
Solapur Political Clash: सोलापुरात काँग्रेस-भाजपमधील वाद चिघळल्याचे समोर आले आहे. मध्यरात्री आमदार देवेंद्र कोठे आणि चेतन नरोटे आमनेसामने आले आहेत. या बाचाबाचीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सोलापुरात काँग्रेस आणि भाजपमधील राजकीय संघर्ष आता वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांपर्यंत पोहोचला आहे. त्याचे पडसाद मध्यरात्रीच्या राड्यात उमटल्याचे पाहायला मिळाले. भाजपचे आमदार देवेंद्र कोठे आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यात जोरदार बाचाबाची झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काँग्रेस शहराध्यक्षांच्या घराबाहेर मध्यरात्री हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर विविध चर्चांना उधाण आल्याचे दिसून येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या वादामागे खासदार प्रणिती शिंदे आणि भाजप आमदार देवेंद्र कोठे यांच्यातील शाब्दिक संघर्ष कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरचे पालकमंत्री गोरे यांच्यावर टीका करताना त्यांना ‘लबाड लांडगा’ अशी उपमा दिली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजप आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रणिती शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्याचा आरोप आहे. त्यांनी शिंदे यांना ‘महागाढव’ असे म्हटल्याने राजकीय वातावरण तापले.
या शाब्दिक वादानंतर काँग्रेस आणि भाजपमधील संघर्ष अधिकच तीव्र झाला. त्याच पार्श्वभूमीवर मध्यरात्री काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या घराबाहेर भाजप आमदार देवेंद्र कोठे आणि नरोटे आमनेसामने आल्याचे समजते. यावेळी दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
नेमका वाद कशामुळे आणि कोणत्या मुद्द्यावरून वाढला, याबाबत दोन्ही पक्षांकडून आपापली भूमिका मांडली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता राजकीय रंग चढला आहे. महत्त्वाचे म्हणजे, शहरातील प्रश्न, विकासकामे आणि राजकीय मुद्द्यांवरून होणारी काँग्रेस-भाजपमधील लढाई आता वैयक्तिक टीका आणि थेट आमनेसामने येण्यापर्यंत पोहोचल्याचे या घटनेतून दिसत आहे. राजकीय आरोपांची भाषा अधिक टोकदार होत असताना, आता ही लढाई मुद्द्यांवर राहणार की रस्त्यावर उतरणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.