Devendra Fadnavis : विठ्ठलाची कृपा झाली आणि त्यांचे पाय आमच्या घराला लागले…अरुणा बालपांडे यांचे डोळे पाणावले
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाची दिवाळी एका शेतकरी कुटुंबासोबत साजरी केली. मुख्यमंत्र्यांनी या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्याचा अनुभव कसा होता त्या बद्दल सांगितलं. त्या कुटुंबाने देखील आपल्या भावना व्यक्त केल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाची दिवाळी नागपूर जिल्ह्यातील ‘लोहारी सावंगा’ गावातील रामभाऊ बालपांडे या शेतकरी कुटुंबासोबत सोबत साजरी केली. मुख्यमंत्र्यांनी रामभाऊ बालपांडे या शेतकऱ्याच्या घरी रात्री मुक्काम केला. आज सकाळी मुख्यमंत्र्यांना निरोप देताना अरुणा बालपांडे यांचे डोळे पाणावलेले. आज घरी परत जाताना त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिवाळीचा फराळ, लाडू, चिवडा आणि शेतातील मोसंबी सोबत दिली. “ही दिवाळी अविस्मरणीय आहे. भाऊ मुख्यमंत्री म्हणून दिवाळीत आले आणि आता घरी परत जाताना डोळ्यात अश्रू आलेत. मुख्यमंत्री साधे पणाने राहिले, आमच्या नातीशी खेळले आणि दिवाळी साजरी केली” असं अरुणा बालपांडे म्हणाल्या. “खूप छान वाटले. आमच्याकडे ते रात्री थांबले होते. असं वाटून राहीलं की आमचे जुने ऋणानुबंध आहेत. विठ्ठलाची कृपा झाली आणि त्यांचे पाय आमच्या घराला लागले” असं अरुण बालपांडे म्हणाल्या.
मुख्यमंत्री सुद्धा या कुटुंबाबद्दल भरभरुन बोलले. “मी सर्व प्रथम रामभाऊ बालपांडे कुटुंबाचे आभार मानतो. त्यांनी खूप चांगलं आमचं आगत स्वागत केलं. उत्तम जेवण दिलं. सकाळची न्याहारी पण उत्तम होती. त्या संपूर्ण कुटुंबाशी आमची जवळीक निर्माण झाली आहे. त्यांची नात नारायणी खूप गोड आहे, तिच्यासोबतही आमची मैत्री झालीय” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
हा संपूर्ण परिवार वारीला जाणारा आहे
“शेतकरी कुटुंब आहे. त्यांच्याकडेही दुष्काळाचा परिणाम झालाय. संत्री, कापूस, सोयाबीन या पिकांवर परिणाम झाला आहे. एक समाधानाची बाब आहे की, तीन खातेदार आहेत, त्या तिन्ही खातेदारांना कर्जमाफीचा लाभ मिळालाय. त्यांच्यामध्ये एक लढण्याची जिद्द दिसून आली. हा संपूर्ण परिवार वारीला जाणारा परिवार आहे. विठ्ठल भक्त कुटुंब आहे. त्यांच्याकडून आम्हाला उभारी, आत्मविश्वास मिळाला. त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांच्या घरी खूप छान झोप लागली” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी ‘लोहारी सावंगा’ गावातील शेतकऱ्यांशी,सरपंचांशी संवाद साधला. आज मुख्यमंत्र्यांनी अजून एक मोठी घोषणा केली आहे. 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार आहेत.