Devendra Fadnavis: मीनाताई ठाकरे पुतळा प्रकरणावर CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, पोलीस…

मुंबईतील शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर आज रंग फेकण्यात आल्याची घटना घडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे.

Devendra Fadnavis: मीनाताई ठाकरे पुतळा प्रकरणावर CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, पोलीस...
Fadnavis on Minatai
| Updated on: Sep 17, 2025 | 7:29 PM

मुंबईतील शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर आज रंग फेकण्यात आल्याची घटना घडली आहे. मीनाताई ठाकरे या बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी आणि उद्धव ठाकरे यांच्या मातोत्री आहेत. त्यामुळे शिवसैनिक त्यांना आदराने माँ साहेब म्हणतात. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकल्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. आता पोलीसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आरोपीला पोलीस शोधून काढतील आणि…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला होता. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘अशाप्रकारची घटना ही निषेधार्य आहे. ज्या कुठल्या समाज कंटकांनी हे कृत्य केलं आहे, त्याला पोलिस शोधून काढतील आणि त्याच्यावर कारवाई करतील. यापेक्षा जास्त याला राजकीय रंग देणं मला योग्य वाटत नाही.’

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

या घटनेवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘आजचा प्रकार अत्यंत निंदनीय होता. ज्याला स्वत:च्या आई-वडिलांची नाव घ्यायला शरम वाटते, त्याने हे केलं असावं. महाराष्ट्र पेटवण्याचा हा प्रयत्न असू शकतो. पोलीस या सगळ्या गोष्टीचा शोध घेत आहेत. बघू पुढे काय होतं. पोलीस म्हणतात की, आम्ही शोधून काढू. दोन प्रकारच्या व्यक्ती यामागे असू शकतात, ज्यांना स्वत:च्या आई-वडिलांच नाव घ्यायला लाज वाटते, शरम वाटते अशा लावारिस व्यक्तीने हे केलं असावं.’

परिसरात बंदोबस्त वाढवला

आज पहाटे दादरच्या शिवाजी पार्क येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आई मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तींनी लाल रंग फेकला होता. या घटनेचा शिवसैनिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे शिवाजी पार्क परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काही वेळापूर्वी येथे फॉरेंसिक एक्सपर्टची टीम दाखल झाली होती. त्यांनी फेकलेल्या रंगाचे 5 सॅंपल गोळा करण्याचं काम सुरू केलं आहे.