CM Devendra Fadnavis : दिवाळीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी घेतला एक मोठा निर्णय, शेतकऱ्यांना दिली अजून एक Good News, VIDEO
CM Devendra Fadnavis : नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्र्यांच कौतुक केलय. त्यावरही फडणवीस बोलले. "मोदीजींनी कौतुक केलं. त्यांचे मी आभार मानतो. ही सगळी प्रेरणा त्यांच्याकडूनच मिळते. मोदींजी स्वत: गरीब, वंचित, शेतकरी, दिव्यांग यांचे विषय प्राधान्याने सोडवतात. आपुलकीने व्यवहार करतात. त्यांच्याकडूनच आम्हाला प्रेरणा मिळते" असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाची दिवाळी शेतकऱ्यांसोबत साजरी केली. मुख्यमंत्र्यांनी रामभाऊ बालपांडे या शेतकऱ्याच्या घरी मुक्काम केला. त्यानंतर आज सकाळी ‘लोहारी सावंगा’ गावातील शेतकऱ्यांशी,सरपंचांशी संवाद साधला. आज मुख्यमंत्र्यांनी अजून एक मोठी घोषणा केली आहे. 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही मोठी घोषणा आहे. “आज जर त्या फळबागांना वाचवलं नाही तर झाडं त्या लेव्हलला येण्याकरता 10-12 वर्ष लागतात. बंदी सरसकट उठवली जाणार नाही, फक्त शेतकऱ्यांच्या फळबागा आहेत, तिथे 15 डिसेंबरपर्यंत बंदी उठवणार आहोत. पण त्यावर प्रशासनाची करडी नजर असेल” असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. “आपल्याला भूगर्भातील पाणी मे महिन्यापर्यंत पुरवायचं आहे .खास बाब म्हणून फळबागा वाचवण्याकरता हा निर्णय घेण्यात आला आहे. फ्लशिंगवर बंदी नाही, खोली करण्यावर बंदी आहे. परवानगी घ्यावी लागेल” हे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
“मूळामध्ये आपल्याला कल्पना आहे, काल रात्री आपण शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. आज सरपंच बोलावले आहेत. सरपंचांसोबत सोबत चर्चा केली. शेतकऱ्यांचे गावातले प्रश्न, रस्त्याचे प्रश्न, तलावाचे प्रश्न असे विविध प्रश्न आपल्यासमोर आले. बरेचसे प्रश्न हे मार्गी लागण्यासारखे आहेत. काही ठिकाणी पालकमंत्री, आमदारांनी मान्यता दिली आहे. काही निवेदनं आली आहेत, काही चांगल्या सूचना आल्या आहेत त्यावर काम करु. त्याची अंमलबजावणी कशी करता येईल यावर काम करु. अतिशय पोटतिडकीने सरपंचांनी आपले विषय मांडले आहेत. सगळ्यांचे विषय ऐकून घेतले. त्यातून आता जास्तीत जास्त मार्ग कसे काढता येतील त्यावर काम करु” असं मुख्यमंत्री म्हणाले.
त्यांनी खूप चांगलं आमचं आगत स्वागत केलं
मुख्यमंत्र्यांनी रामभाऊ बालपांडे कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली, त्यांच्याकडे मुक्काम केला तो अनुभव सांगितला. “मी सर्व प्रथम रामभाऊ बालपांडे कुटुंबाचे आभार मानतो. त्यांनी खूप चांगलं आमचं आगत स्वागत केलं. उत्तम जेवण दिलं. सकाळची न्याहारी पण उत्तम होती. त्या संपूर्ण कुटुंबाशी आमची जवळीक निर्माण झाली आहे. त्यांची नात नारायणी खूप गोड आहे, तिच्यासोबतही आमची मैत्री झालीय” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
त्यांच्यामध्ये एक लढण्याची जिद्द दिसून आली
“शेतकरी कुटुंब आहे. त्यांच्याकडेही दुष्काळाचा परिणाम झालाय. संत्री, कापूस, सोयाबीन या पिकांवर परिणाम झाला आहे. एक समाधानाची बाब आहे की, तीन खातेदार आहेत, त्या तिन्ही खातेदारांना कर्जमाफीचा लाभ मिळालाय. त्यांच्यामध्ये एक लढण्याची जिद्द दिसून आली. हा संपूर्ण परिवार वारीला जाणारा परिवार आहे. विठ्ठल भक्त कुटुंब आहे. त्यांच्याकडून आम्हाला उभारी, आत्मविश्वास मिळाला. त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांच्या घरी खूप छान झोप लागली” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.