Sanjay Raut: सैनिकांसोबत दिवाळी साजरी केल्याने चीनची घुसखोरी… संजय राऊतांचा जिव्हारी वार
Sanjay Raut On Narendra Modi: खासदार संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला. सैनिकांसोबत आणि शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्यावरून त्यांनी जिव्हारी वार केला.

Sanjay Raut On Devendra Fadnavis: मुख्यमंत्री आणि इतर मंत्री यांनी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन दिवाळी साजरी करण्याचा संकल्प सोडला आहे. देवेंद्र फडणवीस हे नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या घरी जाऊन थांबले. महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्यासह इतर मंत्र्यांनी हाच कित्ता गिरवला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सैनिकांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. त्यावरून आज उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला. त्यांनी हा केवळ एक इव्हेंट होऊ नये असे सुचवत खोचक टोला लगावला. काय म्हणाले राऊत?
एका दिवसाने त्यांचे दुःख कमी होणार नाही
सर्व मंत्री आणि मुख्यमंत्री हे शेतकऱ्यांच्या घरी जाऊन दिवाळी साजरी करणार आहेत. त्यांची संकल्पना चांगली आहे. राज्यात दुष्काळ आहे. शेतकरी अस्वस्थता आहे. ही संकल्पना चांगली आहे, आता त्यांनी जाऊन पाहिली पाहिजे की, त्यांनी जी ५,००० रुपयांची मदत दिली आहे, ती पुरेशी आहे का? आता ते त्यांना शेतकऱ्यांच्या घरी आणि बांधावर गेल्यावर कळेल. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन दिवाळी साजरी केली यावरून त्यांच्यावर टीका करण्यात काही अर्थ नाही. सरकार हे शेतकऱ्यांसोबत आहे हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण शेतकऱ्यांच्या घरी एक दिवस दिवाळी साजरी करून त्याचे दुःख कमी होणार नाही. त्यांचे प्रश्न संपणार नाही. सरकारला अत्यंत ठोस निर्णय घ्यावे लागतील. सरकारला वारंवार शेतकऱ्यांच्या घरापर्यंत, बांधापर्यंत पोहचावं लागेल इतकेच मी सांगतो, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
चीनची घुसखोरी थांबणार नाही
गेल्या काही वर्षांपासून पंतप्रधान हे सैनिकांसोबत दिवाळी साजरी करतात. पण सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली म्हणून चीनची घुसखोरी थांबत नाही ना. किंवा पुलवामा, पहलगाम सारखे थांबत नाहीत, असा झोंबणारा सवाल राऊतांनी केला. हा तुमचा एक दिवसाचा कार्यक्रम आहे. पुढे काय? मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन दिवाळी साजरी केली, यात नवीन काय, यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी असे उपक्रम राबवले आहे. त्यात खास कौतुक करण्यासारखे काय आहे. मुख्यमंत्र्यांचं, राज्यकर्त्यांचं ते कर्तव्यच आहे. शेतकऱ्यांची अवस्था तुम्ही जाऊन पाहायला हवी. मुख्यमंत्री शेतकऱ्याच्या घरी जाऊन, मांडी घालून फराळ करतायेत. पण हा फराळ खरोखर त्या शेतकऱ्याच्या घरी झालाय की जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे, असा खोचक सवालही राऊतांनी विचारला.
