
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा काल पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी सरकारवर जोरदार टीका केली. आम्हाला जर तुम्ही हिंदुत्व शिकवण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्ही भाजपला परत सांगतो की तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग तुम्ही काढून टाका आणि मग आमच्याशी हिंदुत्वाचा गप्पा मारा. तुमचं ते फडकंच आहे कारण तो भगवा असूच शकत नाही, कारण भगवा हा शिवसेनेच्या हातात आहे, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला होता. आता उद्धव ठाकरेंच्या याच भाषणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी उद्धव ठाकरे यांचे आभार मानतो की त्यांनी माझे १००० रुपये वाचवले, असा जबरदस्त टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला.
देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना उद्धव ठाकरे, दसरा मेळावा आणि ठाकरेंचे भाषण याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी जबरदस्त टोला लगावला. मी उद्धव ठाकरे यांचे आभार मानतो की उद्धव ठाकरेंनी माझे १००० रुपये वाचवले. कारण मी आवाहन केले होतं की उद्धव ठाकरे यांच्या भाषणात विकासाच्या संदर्भातील एक मुद्दा दाखवा आणि १ हजार रुपये मिळवा, असा टोला फडणवीसांनी लगावला.
काल मी त्यांचं भाषण ऐकलं नाही. पण भाषण संपल्यावर जे भाषण ऐकणारे आहे त्यांना याबद्दल विचारणा केली. मला १ हजार रुपयाचा फटका आहे का, उद्धव ठाकरे काहीतरी विकासावर बोलले का, असे विचारले. उद्धव ठाकरे संपूर्ण भाषणात विकासावर एक मुद्दा बोलले नाहीत. ते बोलूच शकत नाही. त्यांचं बोलणं हे स्व:गत असतं, कारण पुढे माणसंही नव्हती. त्यामुळे त्यांचं बोलणं हे स्व:गत होतं. तरीही त्यांचे आभार मानतो की त्यांनी नेहमीच्या पद्धतीने लोकांच्या संदर्भात, विकासाच्या संदर्भात, लोककल्याण कसं करणार, राज्याला पुढे कसं नेणार, पालिकेला पुढे कसं नेणार, याबद्दल अवाक्षरही न काढता मी जे बोललो ते सत्य करुन दाखवलं आणि माझे १००० रुपये वाचवले, त्याबद्दल आभार, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राजकारण त्यांनी बाजूला ठेवलं तर आम्हीही ठेवलं. आम्हीही ठेवलं. त्यांनी अतिवृष्टी बाबत राजकारण सुरू केलं. तेही सत्तेत होते. सत्तेत असताना जेव्हा जेव्हा आपत्ती आली तेव्हा त्यांनी काय केलं हे पाहावं. अशा प्रकारच्या आपत्तीत विरोधी पक्षाने काय केलं, काय निर्णय घेतला. काय जीआर केला याचा त्यांनी आरसा पाहावा, असेही देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.
राहुल गांधींना भारताच्या संविधानाच्या ताकदीवर विश्वास नाहीये. कारण ते भारताचा इतिहास जाणत नाहीत. त्यांच्या आजीने आणीबाणी लागू करून संविधान बदललं. एकाधिकारशाही आणण्याचा प्रयत्न केला. पण जनतेने त्यांना उलथवून लावलं. यांचा दिमाग कमजोर आहे. राहुल गांधी हे सीरिअल लायर आहेत, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.