मोठी बातमी! एकनाथ शिंदेंनी डाव टाकला, काँग्रेसचे 19 नगरसेवक फोडले; थेट पक्षप्रवेशाने खळबळ

Congress Corporators join Shivsena : विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर नगर परिषदेच्या काँग्रेसच्या नगराध्यक्षा मंदाकिनी भारसाकळे यांच्यासह नगर परिषदेचे 19 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंनी डाव टाकला, काँग्रेसचे 19 नगरसेवक फोडले; थेट पक्षप्रवेशाने खळबळ
Congress 19 corporators join shiv sena
Image Credit source: X
| Updated on: Aug 14, 2026 | 5:20 PM

राज्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या घडामोडी पहायला मिळाल्या आहेत. अनेक नेत्यांनी सत्ताधारी पक्षांमध्ये प्रवेश केल्याचे समोर आले आहे. खासकरून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत अनेकांनी प्रवेश केला आहे. अशातच आता विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर नगर परिषदेच्या काँग्रेसच्या नगराध्यक्षा मंदाकिनी भारसाकळे यांच्यासह नगर परिषदेचे 19 नगरसेवक, तसेच अकोल्यातील ज्येष्ठ नेते रामदास बोडके यांचे पुत्र दीपक बोडके आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह प्रहार संघटना, शौर्य सेना, आजाद समाज पक्ष व कर्नाटकातील बेळगाव येथील अनेक पदाधिकारी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश आमदार तथा माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का

आज पार पडलेल्या या प्रवेशामुळे दर्यापूर नगर परिषदेतील काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे. तर विदर्भात शिवसेनेची संघटनात्मक ताकद आणखी बळकट झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील नंदनवन या निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या प्रवेश सोहळ्यात बोलताना एकनाथ शिंदे यांनी नव्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत करत स्पष्ट शब्दांत सांगितले की, ‘दर्यापूरच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि विकासकामांना महायुती सरकारची संपूर्ण साथ राहील.’

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

शिंदे यांनी बच्चू कडू यांच्या कार्याचे विशेष कौतुक करत सांगितले की, ‘विदर्भात सर्वसामान्य, शेतकरी, दिव्यांग आणि वंचित घटकांसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला आहे. त्यामुळे विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा शिवसेनेकडे वाढता ओढा हा जनविश्वासाचा पुरावा असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी शिंदे यांनी, महाराष्ट्र हे दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे देशातील पहिले राज्य असल्याची आठवण करून देत, गोरगरीब आणि सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे हेच महायुती सरकारचे ध्येय असल्याचे सांगितले. ‘विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला शिवसेनेत सन्मानाचे स्थान आहे, असेही ते म्हणाले.

शिवसेनेची ताकद वाढली

आजच्या प्रवेश सोहळ्यास विदर्भ व कर्नाटकातील विविध संघटनांचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, शाखाप्रमुख आणि शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली विदर्भात सुरू असलेली संघटनवाढ आणि या सामूहिक प्रवेशामुळे आगामी स्थानिक राजकारणात शिवसेनेचे बळ अधिक वाढण्याचे संकेत मिळत आहेत. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार तथा माजी मंत्री बच्चू कडू, आमदार प्रा. मनीषा कायंदे, अमरावती जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सुधाकरराव भारसाकळे, यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us