Farmers Protest: रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला काँग्रेसचं बळ! नाना पटोलेंची मोठी घोषणा, नागपूर विधानसभेवर काँग्रेसही धडकणार

Rohit Pawar Gets Congress Backing for Farmers Protest: रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. नाना पटोलेंनी घोषणा केली आहे. यामुळे आता नागपुरात काँग्रेसही धडकणार आहे.

Farmers Protest: रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला काँग्रेसचं बळ! नाना पटोलेंची मोठी घोषणा, नागपूर विधानसभेवर काँग्रेसही धडकणार
Congress Mega Rally at Nagpur Assembly
| Updated on: Nov 24, 2026 | 5:06 PM

रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली शेगाव ते नागपूर विधानसभेवर निघणाऱ्या शेतकरी मोर्चाला आता काँग्रेसनेही पाठिंबा जाहीर केला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जो कोणी आवाज उठवेल, त्याच्या पाठीशी काँग्रेस पक्ष ठामपणे उभा राहील, अशी भूमिका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी स्पष्ट केली आहे. एवढेच नाही, तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसकडूनही नागपूर विधानसभेवर महामोर्चा काढण्यात येणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी केली आहे.

नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विरोधक आक्रमक होताना दिसत आहेत. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली शेगाव येथून नागपूर विधानसभेवर शेतकरी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला काँग्रेसने पाठिंबा दिल्यामुळे सरकारविरोधातील आंदोलनाला आता राजकीय बळ मिळण्याची शक्यता आहे.

Loading...

नाना पटोले यांनी सरकारवर निशाणा साधताना राज्यातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. सरकार शेतकऱ्यांना न्याय देण्यात अपयशी ठरले असून, राज्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढणाऱ्या प्रत्येक घटकासोबत काँग्रेस पक्ष उभा राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. केवळ रोहित पवार यांच्या मोर्चाला पाठिंबा देऊन काँग्रेस थांबणार नसल्याचे नाना पटोले यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे.

काँग्रेस पक्षाच्या वतीनेही नागपूर विधानसभेवर स्वतंत्र मोठा मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मोर्चाची तारीख आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. प्राथमिक चर्चेनुसार 8 तारखेला हा मोर्चा काढला जाऊ शकतो. याबाबत पक्षांतर्गत चर्चा सुरू असल्याची माहिती पटोले यांनी दिली. दुसरीकडे, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येपूर्वी त्यांच्या सुरक्षेत करण्यात आलेल्या कथित त्रुटींचा मुद्दाही नाना पटोले यांनी उपस्थित केला.

सोनिया गांधी यांच्या पुस्तकात राजीव गांधी यांच्या सुरक्षेबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवर राहुल गांधी यांनीही भूमिका मांडली आहे. यावर प्रतिक्रिया देताना पटोले यांनी राहुल गांधी यांचे समर्थन केले. त्या काळात प्रशासनात काही विघातक प्रवृत्तीचे लोक होते, असे म्हणत पटोले यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. पंतप्रधानांसारख्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षेचा प्रश्न असतानाही प्रशासनातील काही लोकांकडून जाणीवपूर्वक त्रुटी ठेवल्या गेल्या असतील, तर हा गंभीर विषय आहे.

त्यामुळेच सोनिया गांधी यांनी आपल्या पुस्तकात या घटनांचा उल्लेख केला असावा, असे मत पटोले यांनी व्यक्त केले. एकीकडे शेतकरी प्रश्नांवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सरकारविरोधात आंदोलनाची तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे राजीव गांधी यांच्या सुरक्षेचा मुद्दाही राजकीय चर्चेत आला आहे. त्यामुळे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात शेतकरी प्रश्नांसह राजकीय मुद्द्यांवरूनही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष रंगण्याची चिन्हे आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us