राज्याच्या राजकारणात होणार उलथापालथ? काँग्रेसची शिंदेंच्या आमदाराला खुली ऑफर, चर्चांना उधाण
भंडारा विधानसभा मतदारसंघातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाने थेट शिंदेंच्या आमदाराला ऑफर दिली.

राज्याच्या राजकारणात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय नेत्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी चाचपणी सुरू केली आहे. राजकीय पक्षही सर्वसामान्यांच्या मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. विरोधी पक्षाची मंडळी विविध आंदोलन, मोर्चांना हजेरी लावताना दिसत आहे. तर सत्ताधाऱ्यांनी जेन-झी तरुणांना आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेसनेही संपूर्ण राज्यात तयारी करत असल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेत्यांनी नागरिकांच्या मुद्यांवर बैठका घेताना दिसत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ देखील विविध मोर्चांना हजेरी लावताना दिसत आहे. याच घडामोडीदरम्यान काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी थेट शिंदे गटाच्या आमदाराला मोठी ऑफर दिली आहे. काँग्रेस नेत्याने खुलेआम दिलेल्या ऑफरची जोरदार चर्चा होत आहे.
भंडाऱ्यातील काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी शिंदेंच्या शिवसेनेचा आमदार नरेंद्र भोंडेकर यांना खुली ऑफर दिली. महायुतीला लाथ मारून स्वाभिमानाने काँग्रेसमध्ये या, असं म्हणत काँग्रेस नेत्याने ऑफर दिली. दहीहंडीच्या कार्यक्रमात काँग्रेस जिल्हाध्यक्षाने नरेंद्र भोंडेकरांचा केलेल्या कौतुकानंतर भंडाऱ्यात राजकीय वातावरण तापलं आहे. भंडारा-पवनी मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला, भाजपचे अस्तित्व नाही, भोंडेकरांचे गुलाल आणि हार घालून स्वागत करण्यास तयार आहोत, असेही या नेत्याने म्हटलं.
नेमकं काय घडलं?
भंडाऱ्यातील काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी एकाच वेळी दहीहंडी कार्यक्रमाला हजेरी लावली. काँग्रेस नेत्याने चक्क शिंदे गटाचे आमदार भोंडेकर यांच्या कामांचे कौतुक केलं. या कौतुकाने भंडारा विधानसभेतील राजकीय वातावरण तापलं आहे. त्यानंतर शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना काँग्रेसकडून थेट पक्षात येण्याची खुली ऑफर देण्यात आली आहे. महायुतीमध्ये त्यांचा सतत अपमान होत आहे. त्यामुळे त्यांनी सत्तेला लाथ मारून काँग्रेसमध्ये यावे, असे आवाहन भंडारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष मुकुंद साखरकर यांनी केलं. भंडारा-पवनी विधानसभा मतदारसंघ हा सुरुवातीपासून काँग्रेस आणि शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे या विधानसभेत भाजपचे कोणतेही अस्तित्व नव्हते, असा दावा काँग्रेस अध्यक्षांनी केलाय.
महायुतीमध्ये आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा सातत्याने अपमान होत असल्याचे संपूर्ण भंडारा पाहत आहे. त्यामुळे त्यांनी स्वाभिमानाने महायुतीतून बाहेर पडून काँग्रेसमध्ये प्रवेश करावा. आमदार भोंडेकर काँग्रेसमध्ये येण्यास तयार असतील, तर त्यांचे गुलाल उधळून आणि हार घालून जंगी स्वागत केले जाईल, असा संदेशही देण्यात आला. ज्याप्रमाणे आमदार नाना पटोले यांनी खासदारकी आणि सत्तेवर लाथ मारून स्वाभिमानाने काँग्रेसमध्ये पुनरागमन केले आणि लोकसभेत पक्षाला मोठे यश मिळवून दिले, तसेच भोंडेकरांनीही निर्णय घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
