गोळवलकर आणि हेडगेवार यांचे पुतळे काढून तिथे…काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच वक्तव्य

"बंदुका आणि कोयते घेऊन माणसं फिरत आहेत. प्रचाराला अडवत आहेत. तीन ठिकाणी खून झाले. भाजप पोकळ पक्ष आहे. भाजप विरोधकांचे नेते खाणारी चेटकीण आहे" असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

गोळवलकर आणि हेडगेवार यांचे पुतळे काढून तिथे...काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच वक्तव्य
Harshwardhan Sapkal
| Updated on: Jan 09, 2026 | 1:21 PM

“नगरपरिषद निवडणुकीत अनेक ठिकाणी बोगस मतदान झालं. अनेक व्हिडिओ देखील समोर आले. आमचा संविधानावर विश्वास असून सत्य पुढे घेऊन जात आहे. आम्ही सत्तेचा खेळ नाहीतर लोकशाही वाचवण्याच्या अनुषंगाने लढत आहोत. इंग्रज जुलमी होते. त्यांच्याकडे हुकूमशाही आणि दंडेलशाही होती. त्यावेळी काँग्रेसने संघर्ष उभा केला. ज्यावेळी काँग्रेसच्या नेत्यांना अटक झाली, तेव्हा अहिल्यानगरच्या जेलमध्ये ठेवण्यात आलं” असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

“आज त्याचं पद्धतीचं काम सुरू आहे. विरोधक प्रचाराला फिरू नये यासाठी हेलिकॉप्टर, हेलिपॅड ब्लॉक करुन ठेवण्याचे काम सत्ताधारी करत आहेत. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही नागरिकांना अर्थात हात देत आहोत. निवडणुकीत रस्ते, पाणी, ट्रॅफिक, पथदिवे, सुरक्षा, सौंदर्य हे मुद्दे प्रचारात पाहिजेत” असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

सत्ताधाऱ्यांमध्ये नुरा कुस्ती सुरु

“मात्र या निवडणुकीत मराठी पाहिजे की उर्दू पाहिजे? महाराष्ट्रातला पाहिजे की उत्तर प्रदेश पाहिजे? असे मुद्दे आणले जात आहेत. सत्ताधाऱ्यांमध्ये नुरा कुस्ती सुरू आहे, एकमेकांवर टीका करत आहेत.सरकारमधून बाहेर पडा मग आरोप करा. मात्र नुरा कुस्ती सुरू आहे. बिनविरोध जे निवडून आले, ते दमदाटी करून आले आहेत” असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

त्याचा आम्ही निषेध करतो

“महाराष्ट्रातलं वातावरण खराब करण्यासाठी काही लोकांना नेमून दिलं आहे. त्यात पहिले नगरचे देखील नाव येतं. विलासराव देशमुख यांच्या बद्दल वक्तव्य केलं. त्याचा आम्ही निषेध करतो. भाजपाला विलासरावंसह गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, बाळासाहेब ठाकरे यांच्यासह शरद पवारांचे नावे पुसून टाकायचे आहे” असा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

गोळवलकर यांचेही नाव पुसायचे आहे

“भाजपने गेल्या काही वर्षात अटलजींच्या नावाने कोणतीही योजना आणली नाही. त्यामुळे त्यांना अटलजी, अडवाणी, हेडगेवार, गोळवलकर यांचेही नाव पुसायचे आहे. नागपूर संघ कार्यालयातील गोळवलकर आणि हेडगेवार यांचे पुतळे काढून तिथे मोदी आणि शहांचे पुतळे बसवायचे आहेत” असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

भाजप विरोधकांचे नेते खाणारी चेटकीण

“विरोधक प्रचाराला फिरू नये यासाठी हेलिकॉप्टर, हेलिपॅड ब्लॉक करुन ठेवण्याचे काम सत्ताधारी करत आहेत. विरोधकांच्या नेत्यांच्या दौऱ्याची माहिती घेऊन त्या ठिकाणची जागा, हेलिकॉप्टर अडवून ठेवण्याचे काम सत्ताधारी करत आहेत” असा हर्षवर्धन सपकाळ यांनी आरोप केला.