नवी मुंबईत अधिक प्रभावीपणे ‘मिशन ब्रेक द चेन’, मॉलमध्ये प्रवेशासाठी कोरोना चाचणी बंधनकारक!

| Updated on: Mar 23, 2021 | 6:45 PM

नवी मुंबई प्रशासनानेही आता मिशन ब्रेक द चेन अधिक प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेतलाय. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मॉल्स, डिपार्टमेंटल स्टोअर्स, उद्यानं, बाजार यांसाठी नवी नियमावली जारी केली आहे.

नवी मुंबईत अधिक प्रभावीपणे मिशन ब्रेक द चेन, मॉलमध्ये प्रवेशासाठी कोरोना चाचणी बंधनकारक!
Follow us on

नवी मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. विविध मेट्रो सिटीमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाकडून कठोर निर्बंध लादण्यात येत आहेत. नवी मुंबई प्रशासनानेही आता मिशन ब्रेक द चेन अधिक प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेतलाय. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मॉल्स, डिपार्टमेंटल स्टोअर्स, उद्यानं, बाजार यांसाठी नवी नियमावली जारी केली आहे. नियमांचा भंग होत असेल तर तात्काळ कारवाईचे आदेशही देण्यात आले आहेत.(Corona test is now mandatory for entry into malls in Navi Mumbai)

नव्या आदेशानुसार आता मॉलमध्ये प्रवेश देताना प्रत्येक अभ्यागताची कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. गेल्या 72 तासांमधील कोरोना चाचणी (RT-PCR) अहवाल निगेटिव्ह असल्याचं प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय मॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. त्याचबरोबर शॉपिंग मॉलमध्ये योग्य सामाजिक अंतर न पाळता मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचं आढळल्यास प्रत्येक वेळी 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.

त्याचबरोबर 2 वेळा दंड आकारला गेल्यास आणि तिसऱ्यांदा पुन्हा नियमांचं उल्लंघन झाल्यास शॉपिंग मॉल पूर्णत: बंद करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. दुसरीकडे उद्यानातील ओपन जीम, ग्रीन जीम, खेळाचं साहित्य हे पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहेत. कुठल्याही प्रकारे त्यांचा वापर करता येणार नसल्याचं महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

पनवेलचे सेंट्रल पार्क अखेर बंद

‘टीव्ही 9 मराठी’ने खारघरच्या सेंट्रल पार्कमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला असल्याची बातमी दिली होती. या बातमीनंतर कोरोनाचा वाढता धोका टाळण्यासाठी खारघर येथील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचे आदेश आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले आहेत.

खारघर येथील सेंट्रल पार्कमध्ये हजारोच्या संख्येने नागरिक फिरण्यासाठी येत असतात. त्याची प्रत्यक्ष पाहणी केली असता, तेथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच सेंट्रल पार्क येथे मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा वापर होत नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुढील आदेशापर्यंत बंद करण्याचे निर्देश देण्यात येत आहे.

सेंट्रल पार्कमध्ये लोकांची तोबा गर्दी

पनवेल मनपा क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पनवेल पालिका क्षेत्रात खारघर शहरात सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यापाठोपाठ कळंबोली आणि नवीन पनवेल शहराचा नंबर लागतो. सेंट्रल पार्क परिसरात दररोज हजारोंच्या संख्येने नागरिक हजेरी लावत असतात. अनेक गाड्यांना पार्किंग करण्यासाठीही जागा मिळत नाही.

पनवेलमधील खारघरच्या सेंट्रल पार्कमध्ये लोकांची तोबा गर्दी पाहायला मिळत होती. मात्र पनवेल मनपा याकडे कानाडोळा करत आहे. या सेंट्रल पार्कमध्ये दररोज हजारोंच्या संख्येने नागरिक गर्दी करत आहे. तसेच या ठिकाणचे पार्किंगसुद्धा हाऊसफुल पाहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या :

नवी मुंबईत ‘जम्बो कोव्हिड लसीकरण केंद्र’, पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचं ‘मिशन लसीकरण’ जोरात!

VIDEO : एपीएमसी मार्केटमध्ये तुंबळ हाणामारी, क्षुल्लक कारणामुळे व्यापाऱ्याला बेदम मारहाण

Corona test is now mandatory for entry into malls in Navi Mumbai