Nashik | समीक्षकांनी गीताकडे पाहण्याची दृष्टी बदलावी, कवी रामदास फुटाणे यांचे आवाहन

| Updated on: Dec 03, 2021 | 9:29 PM

आपल्याकडे समीक्षक गीतकारांना कवीपेक्षा कमी महत्त्व देतात. ग. दि. माडगुळकर सारख्या कवींना सुद्धा गीतकार म्हणून हिणवले गेले होते. समीक्षकांनी गीताकडे पाहण्याची दृष्टी बदललावी, असे आवाहन कवी रामदास फुटाणे यांनी केले.

Nashik | समीक्षकांनी गीताकडे पाहण्याची दृष्टी बदलावी, कवी रामदास फुटाणे यांचे आवाहन
रामदास फुटाणे, कवी.
Follow us on

कुसुमाग्रजनगरी, नाशिकः आपल्याकडे समीक्षक गीतकारांना कवीपेक्षा कमी महत्त्व देतात. ग. दि. माडगुळकर सारख्या कवींना सुद्धा गीतकार म्हणून हिणवले गेले होते. समीक्षकांनी गीताकडे पाहण्याची दृष्टी बदललावी, असे आवाहन कवी रामदास फुटाणे यांनी केले. साहित्य संमेलनातील कविकट्ट्याचे उद्घाटन फुटाणे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला न्या. जं. पा. झपाटे, आयपीएस दत्ता कराळे, आयपीएस शेखर-पाटील उपस्थित होते.

कुणी कुणाला शिकवू नये

कवी फुटाणे म्हणाले की, मित्रांनो कविता कशी असावी किंवा कशी नसावी हे कुणी कुणाला शिकवू नये. अनुभूती, प्रज्ञा, व प्रतिभा ही ज्याची जशी असेल तशी त्याची कविता असेल. त्यामुळे कवितेची विविध रुपे व्यक्त होतील. आपली कविता केवळ पुस्तका पुरतीच मर्यादीत असते असे नाही, तर आपणास ती मंचावरून श्रोत्यासमोर सुद्धा सादर करावी लागते. पुस्तकातील एकांतात वाचली जाणारी कविता व समूहात मंचावरून सादर केलेली कविता या दोन्हीही परिणामकारक असू शकतात, म्हणून आपली कविता श्रोत्यांना सुद्धा सहज सोप्या भाषेत जर आपण लिहली तर कविता अनेकापर्यंत पोहचू शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

दुर्बोधता हवी कशाला

फुटाणे पुढे म्हणाले की, दुर्बोधता हा कवितेचा गुण ठरता कामा नये. ज्या श्रोत्यांना ज्ञानेश्वर कळतो, नामदेव कळतो, तुकाराम कळतो त्यांना आपली कवितासुद्धा कळली पाहीजे. इतकी ती सोप्या भाषेत असावी. अलीकडे मंचावरून कविता सादर करणाऱ्या कवींना काही महाभाग दुय्यम लेखतात व विद्यापीठीय व मंचीय असे दोन भाग करतात.

नाचू कीर्तनाचे रंगी
ज्ञानदीप लावू जगी…

ही नामदेवाची किर्तनाची थोर परंपरा आहे. प्रवचनामध्ये एखाद्या विचारांचे विश्लेषण असते. तर कीर्तनामध्ये त्याच विचाराचे सोप्या भाषेत सादरीकरण असते. त्यामुळे मनोरंजन असो की प्रबोधन, कविता उत्तम पद्धतीने सादर करणे हे महत्त्वाचे असते. गेले 40 वर्षे मी जी कवितेची चळवळ उभी केली आहे. त्यातून विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, गोवा इत्यादी भागातील अनेक कवी पुणे-मुंबईतील श्रोत्यांनी आणि वाचकांनी गौरविले आहेत. नाटकापेक्षाही मनोरंजक व कीर्तनापेक्षाही प्रबोधनकारक कविता सादर करणे ही कवींची जबाबदारी आहे. आणि अशा प्रकारची कवी संमेलने मराठीचा प्रभावीपणे प्रचार करू शकतात, असे आवाहन त्यांनी केले.

हिंदी चित्रपटांनी भाषेचा प्रसार

फुटाणे म्हणाले की, हिंदी भाषेचा प्रचार हिंदी विद्यापीठापेक्षा हिंदी चित्रपटांनी व संगिताने जगभर केला आहे. त्यामुळे मराठी चित्रपट, संगीत, नाटक, मराठी कथा, कविता, कादंबऱ्या या जितक्या सकस असतील तितक्या त्या जनमानसात रुजल्या जातील. आरती, पोवाडे, गीते, व्यंगकविता, अभंग, ओव्या, पाळणा, वात्रटिका, भाष्यकविता, हायकू ही सर्व कवितेचीच भावंडे आहेत. आपल्या आवडीनुसार जो तो आपला आनंद निवडत असतो. आपल्याकडे समीक्षक गीतकारांना कवीपेक्षा कमी महत्त्व देतात. ग. दि. माडगुळकर सारख्या कवींना सुद्धा गीतकार म्हणून हिणवले गेले होते. गेली अनेक वर्षे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील, सर्व शाळांमधून वार्षिक स्नेह संमेलनात

नाचरे मोरा आंब्याच्या वनात
नाचरे मोरा नाच…

हे गीत लहान लहान मुले नाचताना, गाताना दिसतात. हे गीत काही कमी महत्त्वाचे आहे का? तेव्हा ही जी समीक्षकांची गीताकडे पाहण्याची दृष्टी बदलली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

गेय कविता हद्दपार

फुटाणे पुढे म्हणाले की, अलीकडे शाळेच्या अभ्यासक्रमातून सुद्धा गेय कविता हद्दपार होते की काय अशी शंका वाटते. परंतु 10 वीपर्यतच्या अभ्यासक्रमात जर मराठी गेय कविता वृत्त आणि छंदामधील असतील व त्या शिक्षकांनी गाऊन सादर केल्या असतील तर त्या विद्यार्थ्यांच्या कायम लक्षात राहतात.

खडबड हे उंदीर करिती
कण शोधाया ते फिरती
परी अंती निराश होती
लवकर हे ही सोडतील सदनाला
गणगोत जसे आपणाला…

अशा कितीतरी ओळी चौथी-पाचवीत वाचलेल्या पाठ आहेत. आवडणारी गेय कविता माणूस सहज पाठ करू शकतो व अनेक वर्ष गुणगूणत राहतो मुक्त छंदाचे तसे नसते. मुक्त छंद हा सुद्धा एक छंद आहे. लय आहे. मुक्त छंदातील कविता वाचताना विचारांची व शब्दांची लय कायम ठेवणे आवश्यक असते. अन्यथा काही लोक मुक्त छंद म्हणून निबंधच सादर करतात. कवितेचा निबंध होणार नाही याची कवींनी दक्षता घेण्याची गरज आहे, असे आवाहन त्यांनी केले.

 पक्षाचा प्रतिनिधी होऊ नये

फुटाणे म्हणाले की, अलीकडे काही कवींना कवितासंग्रह छापण्याची खूप घाई झालेली असते. आपला कविता संग्रह येण्यापूर्वी आपण मराठी साहित्य किती वाचले आहे याचा स्वतःशीच विचार करावा. आपण किती जग पाहिले आहे. आपली अनुभूती किती संपन्न आहे यावर आपले सर्जन अवलंबून असते. कविता संग्रह छापण्याची घाई करू नका. काही कवींना तर पुस्तक आल्या बरोबर पहिल्याच संग्रहाला पुरस्काराची भूक लागलेली असते, आणि ते असा पुरस्कार मॅनेजसुद्धा करतात. असे कवी फार काळ टिकत नाहीत. आयुष्यभर ते कवितेचे दळण दळत असतात. माझा पहिला काव्य संग्रह “सफेद टोपी लाल बत्ती” हा वयाच्या 44 व्या वर्षी आला. या कवितांना वात्रटिका हा शिक्का बसला. एखादा व्यंगचित्रकार राजकीय किंवा सामाजिक घडणाऱ्या घटनांवर जसे चित्र काढतो तसे या माझ्या भाष्यकविता होत्या. भाष्यकविता हा प्रकार रुजविण्यासाठी मला 40 वर्षे लागली. जर राजकीय व सामाजिक विसंगतीवर व्यंगचित्र भाष्य करू शकतं, तर कवींनीही असं भाष्य का करू नये? सामान्य लोकांचा आवाज यातून का प्रकट होऊ नये हा माझा मूळ उद्देश होता. त्यामुळे व्यंगकवी हा कोणत्याही जातीचा धर्माचा किंवा राजकीय पक्षाचा प्रतीनिधी असता कामा नये. तरच तो उत्तम भाष्यकविता, व्यंगकविता लिहू शकतो, असे कानही त्यांनी यावेळी टोचले.

इतर बातम्याः

Nashik| साहित्य संमेलनाला आजी-माजी अध्यक्ष उपस्थित राहणार नसल्याने रसिकांचा हिरमोड; प्रमुख पाहुणे मुख्यमंत्रीही ऑनलाईन

केंद्राविरोधात राज्याचा शड्डू, मंत्री देसाईंची घोषणा; मराठीच्या अभिजाततेसाठी जनतेच्या न्यायालयात लढा, राष्ट्रपतींकडे याचिका