
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले आहेत. तनिषा सुशांत भिसे या महिलेच्या प्रसूतीसाठी कुटुंबीयांकडून एकूण 10 लाख रुपये मागितले असल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. या महिलेला योग्य उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला आहे. मृत महिला ही भाजपाचे आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांची पत्नी असल्यामुळे या प्रकरणाचे राजकीय पडसादही उमटत आहेत. आता या प्रकरणात रुग्णालयाच्या चौकशीचा अहवाल समोर आला आहे. या अहवालात अनेक गोष्टींचा खुलासा झाला आहे.
काय आहे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या चौकशीचा अहवाल
कमी वजनाची ७ महिन्याची जुळी मुलं, जुन्या आजाराची गुंतागुंत आणि कमीत कमी दोन ते अडीच महिने NICU चे उपचार लागतील हे समजावून सांगण्यात आले होते. १० ते २० लाख खर्च येऊ शकतो याची कल्पना देण्यात आली होती. त्यावर रुग्णाच्या नातेवाईकांनी तुम्ही भरती करुन घ्या, मी प्रयत्न करतो असे सांगितले. रुग्णाच्या नातेवाईकांनी वैद्यकीय संचालक डॉक्टर केळकर यांना फोन केला आणि आपली अडचण सांगितली. त्यावर डॉक्टर केळकरांनी जमतील तेवढे पैसे भरा म्हणजे (नातेवाईकांप्रमाणे दोन ते अडीच लाख) ते डॉक्टर घैसास यांना सांगतो असे सांगितले.
डॉक्टर घैसास यांना असे वाटत होते की रुग्ण पैशांची तजवीज करत आहेत. तशी तजवीज न झाल्यास रुग्णाला ससून रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला होता. वृत्तपत्रांमधल्या माहितीप्रमाणे २८ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता महिला सूर्या हॉस्पिटल वाकडमध्ये भरती झाली. २९ मार्च रोजी सिझेरीयन झाले.
दीनानाथ मंगेशकरमधून सदर रुग्ण ससून आणि तिथून सूर्या हॉस्पिटलमध्ये स्वत:च्या गाडीने गेला. सिझेरियनसुद्धा दुसऱ्या दिवशी झाले याची नोंद घ्यावी. सूर्या हॉस्पिटलच्या माहितीनुसार आधीच्या ऑपरेशनची आणि कॅन्सरसंबंधीची माहिती नातेवाईकांनी लपवून ठेवली होती असे समजतय.
महिला रुग्णासाठी ट्विंस प्रेग्नंसी धोकादायक होती. रुग्ण पहिले सहा महिने तपासणीसाठी रुग्णालयात आलाच नाही. अॅडव्हान्स मागितल्याच्या रागातून भिसे कुटुंबियांनी तक्रार केल्याचा रुग्णालयाने दावा केला आहे. जमेल तेवढे पैसे भरुन अॅडमिट व्हा हा सल्ला रुग्णाने पाळला नाही. तसेच रुग्णालयाचे वैद्यकीय सल्लेही पाळले नाहीत. अॅडमिट होण्याचा सल्लाही गांभीर्याने घेतला नाही. रुग्णाच्या मृत्यूमुळे आलेली निराशा आणि अॅडव्हान्स मागितल्याच्या रागातून दिशाभूल करणारी तक्रार केली गेली असे रुग्णालयाच्या अहवालात म्हटले गेले आहे.