भोंदू खरातच्या मंदिरात कुणासोबत गेले होते? दीपक केसरकरांनी काय सांगितलं?

Deepak Kesarkar : शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर आणि भोंदू अशोक खरातचे फोटो समोर आले आहेत. यानंतर आता केसरकर यांनी ते कुणासोबत मंदिरात गेले होते याबाबत मोठा खुलासा केला आहे.

भोंदू खरातच्या मंदिरात कुणासोबत गेले होते? दीपक केसरकरांनी काय सांगितलं?
Deepak Kesarkar
Image Credit source: Google
| Updated on: Mar 28, 2026 | 7:50 PM

नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरातचे अनेक कारनामे समोर येत आहेत. या प्रकरणाशी शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांचेही नाव जोडले जात आहे, कारण केसरकर आणि अशोक खरातचे काही फोटो समोर आले आहेत. आज दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर भाष्य केले आहे. अशोक खरातची आणि माझी फक्त ओळख आहे, त्याने केलेल्या दुष्कृत्याबाबत मला काहीही माहिती नाही. मी अशा घटनेचा निषेध करतो. माझ्यावर फक्त राजकीय द्वेषा पोटी आरोप केला जात आहे असं केसरकर यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत मंदिरात गेलो होतो – केसरकर

पुढे बोलताना केसरकर यांनी म्हटले की, ‘मी अघोरी गोष्टीत भाग घेतला नाही. खरातच्या वेगवेगळ्या विधीत भाग घेतला नाही. त्याने ज्योतिष ध्यानाचा चुकीचा वापर केल्याचे कळते. मी फक्त एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत मंदिरात गेलो होतो. कारण मी त्या मंदिराबाबत ऐकले होते. शिर्डीपासून 10 मिनिटांवर ते मंदिर होते. शिवमंदिरात शिंदे यांनी पूजा केली होती. त्यावेळी दुसरा कोणताही विधी त्यांनी केलेला नाही.

अघोरी पूजेबाबत माहती नव्हतं – केसरकर

पुढे बोलताना केसरकर यांनी म्हटले की, ‘खरात अघोरी पूजा ते करत आहे हे मला माहीत नव्हते. जर याबाबत मला माहिती असती तर मी त्या मंदिरात गेलो नसतो. मी कुठलीही पूजा करत नाही. मी साई बाबा यांचा भक्त आहे. माझं चांगले वाईट जे काही आहे ते साई बाबा पाहतील. माझा दिवस साई बाबा यांच्या काकड आरतीने सुरू होतो आणि शेजार्तीने संपतो. त्यामुळे मी इतर गोष्टीमध्ये विश्वास ठेवत नाही. माझ्या घरात कोणतीही पूजा झालेली नाही, माझ्या घरात स्वामी समर्थांच्या पादुका येतात, फक्त त्यांची पूजा होते.

खरातला मदत केलेल्यांची चौकशी व्हावी – केसरकर

पुढे बोलताना केसरकर म्हणाले की, SIT मध्ये ज्या ज्या लोकांनी खरातला मदत केल्याचे समोर येईल त्यांची चौकशी झाली पाहिजे. असे प्रकार पुढे व्हायला नको त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. पोलिसांना कल्पना नव्हती. महिलांनी पण मानसिक बळ देण्याची गरज आहे. ज्यांच्यावर अन्याय झाला ते समोर येऊन तक्रार देत नाही. त्यामुळे त्यांचा फायदा घेतला गेला असंही केसरकर यांनी म्हटले आहे.

Follow Us