
ऑपरेशन सिंदूरनंतर केंद्र सरकारने जगातील काही प्रमुख देशात भारतीय खासदारांचं शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. ऑपरेशन सिंदूरची माहिती, पहलगामचा हल्ला आणि पाकिस्तान दहशतवाद्यांना कसा पोसत आहे, त्याचे परिणाम काय होत आहेत याची माहिती देण्यासाठी हे शिष्टमंडळ परदेशात जाणार आहे. खासदारांचे एकूण 8 गट करण्यात आले आहेत. हे आठ गट वेगवेगळ्या देशात जाणार आहेत. मात्र, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यातील एक मोठी त्रुटी समोर आणली आहे. ज्या देशांचा भारत आणि पाकिस्तानशी काडीचाही संबंध नाही, अशा ठिकाणी शिष्टमंडळ पाठवण्याची गरज काय? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. तसेच या शिष्टमंडळाचा टुर्स अँड ट्रॅव्हल्स असा उल्लेख करत राऊत यांनी संभावना केली आहे.
परदेशात जाऊन पाकिस्तानचा पर्दा फाडणाऱ्या या शिष्टमंडळाला ठाकरे गटानेही पाठिंबा दिला आहे. ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी या सुद्धा एका शिष्टमंडळाच्या भाग असणार आहेत. याबाबत उद्धव ठाकरे यांचं केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्याशी बोलणंही झालं आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना शिष्टमंडळावरून केंद्र सरकारला काही सवाल केले आहेत. आता मला कुणावरही टीका करायची नाही. पण ज्या प्रकारे हे शिष्टमंडळ पाठवण्याचा प्रयत्न झाला तो काही बरोबर नाही. ज्या देशांचा भारत आणि पाकिस्तानशी काहीही संबंध नाही, असे देश निवडण्यात आले आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
चीन, तुर्कस्थानलाही पाठवा
जागतिक स्तरावर काही प्रमुख देश नक्कीच महत्वाचे आहेत. मग तुम्ही श्रीलंकेला शिष्टमंडळ पाठवले का? म्यानमारला पाठवले का? सगळ्यात आधी तुम्ही शेजारच्या राष्ट्रात शिष्टमंडळ पाठवायला पाहिजे. तुम्ही चीन, तुर्कस्थानलाही शिष्टमंडळ पाठवयला पाहिजे. भले त्यांनी पाकिस्तानला मदत केली असेल, असं संजय राऊत म्हणाले.
टुर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी…
चीन, तुर्कस्थानलाही सांगायला हवे की पाकिस्तानला मदत करून तुम्ही चूक करीत आहात. नेपाळ सारखे राष्ट्र आपल्या शेजारी आहे. जे हिंदू राष्ट्र म्हणून ओळखले जाते. नेपाळही शत्रूच्या कच्छपी लागले आहे. तिथेही शिष्टमंडळ पाठवले पाहिजे. तुम्ही त्या देशात जाऊन आधी पाकिस्तानचा मुखवटा फाडायला हवा. पण तुम्ही जे काही टूर अँड ट्रॅव्हर्स कंपनी उघडून खासदारांना तिथे पाठवले आहे, त्यामुळे भविष्यात काही फायदा होईल असं मला वाटत नाही.
अधिक सहकार्य केलं असतं
या सरकारने शिष्टमंडळावर ज्यांना पाठवायचे आहे, त्यांची निवड करताना त्या त्या पक्षाच्या प्रमुखांशी सुरुवातीला चर्चा केली नाही. जर आमच्याकडे, आमच्या पक्षप्रमुखांकडे किंवा इतर पक्षाच्या प्रमुखांकडे त्यांनी ज्येष्ठ, अनुभवी सदस्यांची नावे मागितीली असती तर त्यांना आम्ही अधिक चांगल्या प्रकारे नक्कीच सहकार्य केले असतं. जसं की तृणमूल काँग्रेस पक्षाच्या युसूफ पठाणचा भाजपने परस्पर शिष्टमंडळात सहभाग करून घेतला. हे अत्यंत चुकीचे आहे. ममता बॅनर्जी यांनी किरेन रिजिजू आणि त्यांच्या यंत्रणेला जाब विचारला तुम्ही कोण आमचा सदस्य ठरवणारे? ममता बॅनर्जी यांनी अधिक अनुभवी असलेले अभिषेक बॅनर्जी यांना त्या शिष्टमंडळात सामील केलं. हे जवळ जवळ प्रत्येक पक्षात झालंय, असं ते म्हणाले.