अजितदादा यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांची पहिली पोस्ट; काय लिहिलंय?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने मोठी खळबळ उडाली. अजित पवार यांच्या निधनाच्या काही तासात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नुकताच अजित पवार यांच्या निधनानंतर पहिली सोशल मीडिया पोस्ट सुनेत्रा पवार यांनी शेअर केली.

अजितदादा यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांची पहिली पोस्ट; काय लिहिलंय?
Sunetra Pawar
| Updated on: Feb 08, 2026 | 10:17 AM

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. मुंबईहून बारामतीला जात असताना बारामती विमानतळाच्या अगदी जवळ अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर सुरूवातीला सांगितले गेले की, अजित पवार गंभीर जखमी असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यानंतर लगेचच अजित पवार यांच्या निधनाची बातमी पुढे आली. आजही कोणाला विश्वास बसत नाही की, अजित पवार आपल्यात नाहीत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी अजित पवार निघाले होते. धावपट्टीच्या अगदी जवळ त्यांच्या विमानाचा अपघात झाला. अजित पवार यांच्या विमान अपघाताचे अनेक व्हिडीओ पुढे आली. आकाशातच अजित पवार यांचे विमान एका बाजूला कोलमडताना स्पष्टपणे व्हिडीओमध्ये दिसले. सीआयडीकडून अजित पवार यांच्या विमान अपघाताची चाैकशी केली जात आहे. अजित पवार यांच्या सचिवांचीही सीआयडीने चाैकशी केली.

अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, यादरम्यान पवार कुटुंबातील वादही पुढे आला. ऐन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांचे निधन झाल्याने सर्वच राजकीय पक्षांनी म्हणावा तसा प्रचार अजिबात केला नाही. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी लोकांचे आभार मानले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 या लोकशाहीच्या उत्सवात उत्स्फूर्त व सक्रिय सहभाग नोंदवत आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही अधिक मजबूत केल्याबद्दल सर्व मतदार बंधू-भगिनींचे मनःपूर्वक आभार…

संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान राष्ट्रवादी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना, आपले लाडके नेते, राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दूरदृष्टीतील ग्रामीण महाराष्ट्राच्या प्रगतीच्या संकल्पपूर्तीसाठी शिस्तबद्ध, एकजुटीने आणि निष्ठेने पक्षासाठी कार्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व मान्यवर नेते, आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक यांचे विशेष आभार. आपल्या समर्पणामुळे, अथक परिश्रमांमुळे आणि संघटित प्रयत्नांमुळेच पक्षाचे तसेच आदरणीय अजितदादांचे विचार व कार्य अधिक सक्षम आणि परिणामकारकपणे पुढे जात आहे. मनःपूर्वक धन्यवाद… असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.