
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी इंडिया आघाडीच्या सर्व पक्षातील नेत्यांसाठी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, यावेळी राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगा संदर्भातील एक सादरीकरण देखील केलं. त्यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मागच्या पाचव्या रांगेत बसले होते, यावरून आता भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. दरम्यान त्यानंतर याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उद्धव ठाकरे यांना चांगलंच डिवचलं आहे.
नेमकं काय म्हणाले फडणवीस?
आमच्याकडे आमच्यापेक्षाही पहिलं त्यांचं स्थान होतं. त्याच्यामुळे आता तिथे त्यांचा काय मान सन्मान आहे? तो आपल्या लक्षात आलाच आहे. भाषणांमध्ये खूप म्हणायचं दिल्ली समोर मान झुकणार नाही. दिल्लीसमोर आम्ही पायघड्या टाकणार नाही. पण आता दिल्लीमध्ये काय परिस्थिती आहे आणि तेही सत्तेत नसताना. हे बघितल्यावर दु:ख होतं. पण ठीक आहे, अशी खोचक प्रतिक्रिया यावर देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी राहुल गांधी यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. मला असं वाटतं की अलिकडच्या काळामध्ये राहुल गांधी यांनी सलीम जावेद यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडून एक स्क्रिप्ट लिहून घेतली आहे. अतिशय मनोरंजन करणारी ही स्क्रिप्ट आहे. ती स्क्रिप्ट ते सगळीकडे मांडत आहेत. मात्र यामुळे मनोरंजनापलीकडे काहीच होत नाही. एकही गोष्ट त्यांच्याकडे वस्तुस्थितीला धरून नाही. सगळ्या कपोलकल्पित गोष्टी ते त्या ठिकाणी मांडत आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं ते एकीकडे म्हणतात की मतदार यादीत प्रॉब्लेम आहे, आम्हालाही मान्य आहे, आम्ही इतकी वर्ष झाले सांगतो आहोत, आमची मागणी होती कॉप्रेंसिव्ह रिव्हिजन करा, निवडणूक आयोगही कॉप्रेंसिव्ह रिव्हिजन करायला तयार आहे, बिहारमध्ये त्यांनी सुरू पण केलं, पण राहुल गांधी म्हणतात कॉप्रेंसिव्ह रिव्हिजन करू नका, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.