
बीड मधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेचा निकटवर्तीय असल्याचे आरोप करत मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देण्यात यावा अशी मागणी विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील काही नेत्यंनी केला होता. या प्रकरणावरून धनंजय मुंडे खिंडीत सापडलेले असतानाचा आता त्यांच्या अडचणी आणखीनच वाढल्या आहेत. धनंजय मुंडे हे घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी आढळले आहेत. करूणा शर्मांनी लावलेले आरोप कोर्टाकडून मान्य करण्यात आले आहेत. करूणा शर्मांना प्रत्येक महिन्याला 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. यामुळे धनंजय मुंडेंना मोठा झटका बसला आहे.
मात्र धनंजय मुंडेंवर आरोप लावणाऱ्या करूणा शर्मा नेमक्या कोण आहेत, त्यानी काय आरोप लावले होते, हे एकंदर प्रकरण काय आहे, ते जाणून घेऊया.
करूणा शर्मा या धनंजय मुंडे यांच्या (पहिली) पत्नी आहेत, यासाठी त्या मागच्या काही वर्षांपासून त्या कायदेशीर लढाई लढत आहेत. वांद्रे फॅमिली कोर्टामध्ये त्यांनी याचिका दाखल केली होती. धनंजय मुंडेंवर त्यांनी घरगुती हिंसाचाराचा आरोप लावला होता. यावर झालेल्या सुनावणीत कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आणि करूणा शर्मा याच धनंजय मुंडे यांच्या पहिली पत्नी आहेत हे मान्य केलं.
करुणा शर्मा यांची गंभीर तक्रार होती. त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार, घरगुती हिंसाचार आणि इतर कलमांर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. इतकंच नाही तर आपल्या दोन्ही मुलांना धनंजय मुंडे यांनी त्यांच्या चित्रकूट (Chitrakut) बंगल्याच्या मागच्या खोलीत 3 महिने कोंडून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला होता.
दरम्यान करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्यातील व्यक्तिगत कौटुंबिक न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याप्रकरणी न्यायालयाने कोणताही कौटुंबिक हिंसाचाराचा निष्कर्ष काढलेला नाही. कोर्टाचा आदेश फक्त अंतरिम देखभालीसाठी रक्कम देण्याबाबत आहे. जो केवळ आर्थिक निकष लक्षात घेऊन पारित केलेला आहे. कथित हिंसाचाराच्या कोणत्याही आरोपावर आधारित नाही.