
Tuljapur Drugs Case : गेल्या काही दिवसांपासन तुळजापूरमधील ड्रग्ज प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. आतापर्यंत या ड्रग्ज प्रकरणात एकूण 25 आरोपी निष्पन्न झाले आहेत. अजूनही पोलीस या ड्रग्ज तस्करीचा तपास करत असून भविष्यात आणखी मोठे धागेदोर पोलिसांना लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता या ड्रग्ज तस्करी प्रकरणी राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहे. विशेष म्हणजे हा मुद्दा थेट संसदेपर्यंत पोहोचला आहे. या ड्रग्ज प्रकरणात नेत्यांच्या कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचा आरोप महाविकास आघाडी तसेच महायुतीच्या नेत्यांनी एकमेकांवर केला आहे.
तुळजापूर तालुक्यातील तालमवाडी येथे फेब्रुवारी महिन्यात पोलिसांनी कारवाई करून एमडी ड्रग्ज जप्त केला होता. पोलिसांनी एकूण 2.5 लाख रुपये किमतीच्या एकूण 59 एमडी ड्रग्जच्या पुड्या जप्त केल्या होत्या. त्यानंतर या ड्रग्ज तस्करी प्रकरणात अनेकांना अटक करण्यात आलं. आतार्यंत पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात एकूण 25 आरोपींची नावं निश्चित केली असून यातील 14 आरोपींना अटक करण्यात आलंय. तर 11 आरोपी अजूनही फरार आहेत. विशेष म्हणजे या ड्रग्ज प्रकरणात राजकीय लागेबांधे असल्याचाही आरोप केला जातोय.
ड्रग्ज तस्करी प्रकरणात एकमेकांवर आरोप करताना आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर
यांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांचे आरोपी बरोबरचे फोटो सोशल मिडीयावरती पोस्ट केले आहेत. हे सर्व घडत असताना म्हणजेच ड्रग्ज तस्करीचे कथित राजकीय कनेक्शन उघड झाल्यानंतर संभाजीनगरचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्रा धाराशिव जिल्हयात तळ ठोकून आहेत.
याच ड्रग्ज प्रकरणावर बोलताना धाराशिवचे ठाकरे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर निशाणा साधतला आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाची केंद्रीय नार्केाटिक्स व्यूरोकडून चौकशी करावी आशी थेट मागणी त्यांनी संसदेत केली आहे. तर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आरोपी कुठल्याही पक्षाचा असला तरी सोडू नका अशा सूचना जिल्हा पोलीस अधिक्षक संजय जाधव यांना दिल्या आहेत.
दुसरीकडे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे कार्यकर्ते ड्रग्ज प्रकरणात आरोपी असल्याचा आरोप काँग्रेसच्या धीरज पाटील यांनी केला आहे. हा आरोप करताना धीरज पाटील यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे आणि आरोपीचे सोबतचे फोटो दाखवले आहेत. यासह भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनीही सोशल मीडियावर खासदार ओमराजे निंबाळकर व आरोपीचे फोटो व्हायरल करत खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर निशाणा साधलाय.
त्यामुळेच ही संगळी परिस्थिती पाहता छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्रा यांनी धाराशिव जिल्ह्यात येऊन तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचा आढावा घेतला आहे. दोन दिवसांपासून पोलीस महानिरीक्षक मिश्रा हे जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. अशा स्थितीत श्री तुळजाभवानीचे तुळजापूर ड्रग्ज तस्करापासून कोण वाचवणार हा प्रश्न निर्माण झालाय.