धुळ्यात भाजपमध्येच चढाओढीचं राजकारण, अर्धा डझन इच्छुकांमध्ये तीव्र स्पर्धा, लोकसभेची माळ कुणाच्या गळ्यात पडणार?

| Updated on: Feb 27, 2024 | 4:58 PM

लोकसभा निवडणूक आता तोंडावर आली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे लोकसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी चढाओढ सुरु आहे. भाजपच्या उमेदवारीसाठी अर्धा डझन इच्छुकांमध्ये तीव्र स्पर्धा सुरु आहे. दुसरीकडे धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी आपल्याला तिसऱ्यांदा उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न सुरु केले आहेत.

धुळ्यात भाजपमध्येच चढाओढीचं राजकारण, अर्धा डझन इच्छुकांमध्ये तीव्र स्पर्धा, लोकसभेची माळ कुणाच्या गळ्यात पडणार?
Follow us on

मनोहर शेवाळे, Tv9 प्रतिनिधी, धुळे | 27 फेब्रुवारी 2024 : धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी आपल्याला तिसऱ्यांदा उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न सुरु केले आहेत. पण भाजपचे धक्कातंत्र येथे लागू झाल्यास त्यांची वाट बिकट आहे. याशिवाय डॉ. भामरे यांच्याविषयी पक्षांतर्गत नाराजी लपून राहिलेली नाही. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी धुळे मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीसाठी आधीच अर्धा डझन इच्छुकांमध्ये तीव्र स्पर्धा असताना आता शेतकरी मित्र म्हणून नावलौकिक असणारे आणि भाजपमध्ये नुकताच प्रवेश केलेले माजी आयपीएस अधिकारी प्रतापराव दिघावकर यांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे. तर किसान आघाडीचे प्रदेश महामंत्री बिंदूशेठ शर्मा यांनीही उमेदवारीसाठी दावेदारी केली आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघात मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य आणि बागलाण हे नाशिक जिल्ह्यातील तीन आणि धुळे शहर, धुळे ग्रामीण आणि शिंदखेडा या धुळे जिल्ह्यातील तीन अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. डॉ. सुभाष भामरे हे धुळ्यातील भाजपचे विद्यमान खासदार आहेत. याआधी या मतदारसंघातून सलग दोनदा ते निवडून आले आहेत. काही काळ केंद्रात संरक्षण राज्यमंत्री म्हणूनही त्यांना यापूर्वी संधी मिळाली होती. आता तिसऱ्यांदा उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी प्रयत्न सुरु केले असले तरी भाजपचे धक्कातंत्र येथे लागू झाल्यास त्यांची वाट बिकट आहे. याशिवाय डॉ. भामरे यांच्याविषयी पक्षांतर्गत नाराजी लपून राहिलेली नाही.

प्रतापराव दिघावकर यांच्या समर्थकांकडून उमेदवारीची मागणी

भाजपमधील एका गटाने आधीपासूनच त्यांच्या उमेदवारीला विरोध सुरु केला आहे. डॉ. भामरे मात्र उमेदवारीविषयी निश्चिंत असल्याचे सांगतात. निवृत्त पोलीस अधिकारी डॉ. प्रतापराव दिघावकर हे भाजपमध्ये आल्याने दिघावकरांच्या रुपाने यावेळी नाशिक जिल्ह्याला संधी देण्यात यावी, असा आग्रह समर्थकांकडून करण्यात येत आहे. दिघावकर हे बागलाण तालुक्यातील रहिवासी आहेत. तर हिंदुत्ववादी आक्रमक चेहरा मिळावा यासाठी काही हिंदुत्ववादी संघटनांनी आग्रह धरला आहे.

सी. आर. पाटील यांच्या कन्या धरती देवरे सुद्धा शर्यतीत

धुळे मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारीसाठी धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे या इच्छुक असल्याचे सांगितले जाते. देवरे या भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष आणि नवसारीचे खासदार सी. आर. पाटील यांच्या कन्या आहेत. खासदार पाटील हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या विश्वासातील मानले जात असल्याने देवरे यांच्या उमेदवारीसाठी ती बाजू बळकट म्हणावी लागेल.

भाजप प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षांची भेट घेतल्याने अनेक जण बुचकळ्यात

धुळे जिल्हा परिषदेचे सभापती हर्षवर्धन दहिते हेही भाजपकडून उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. मध्यंतरी मालेगाव दौऱ्यावर आलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्या निवासस्थानी भेट देत सर्वांनाच बुचकळ्यात टाकले होते. धुळ्यात काँग्रेस इच्छुकांमध्ये ज्या दोन, तीन नावांचा उल्लेख केला जात आहे, त्यात डॉ. शेवाळे यांच्या नावाचाही समावेश आहे. अशा स्थितीत काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या घरी प्रदेशाध्यक्षांनी दिलेल्या भेटीवरुन भाजपला धुळ्यात काही धक्कातंत्राचा प्रयोग तर करावयाचा नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे. भाजपच्या उमेदवारीसाठी सर्वच इच्छुकांनी मतदारसंघाचा दौरा, गाठीभेटींवर भर देणे सुरु ठेवले आहे. इच्छुक आणि त्यांच्या समर्थकांकडून ठिकठिकाणी फलकबाजी करुन वातावरण निर्मिती केली जात आहे.