
दिवाळी जशी जवळ येते, लोकांची आपल्या घरी, गावी जाण्याची लगबग सुरू असते. कुटुंबियांसोबत घरी दिवाळी साजरी करण्यासाठी सगळेच उत्सुक असतात , साहजिकच त्यामुळे बसल, ट्रेनला मोठा गर्दी होते. पण याच गर्दीमुळे अनेक दुर्घटनाही होतात आणि क्षणात होत्याचं नव्हतं होतं. असाच दुर्दैवी प्रकार मध्य रेल्वेच्या आंबिवली स्टेशनजवळ घडला असून त्यात एका प्रवाशाचा जीव गेला. दिवाळीचा काळ..आणि घराकडे जाण्याची प्रवाशांची लगबग! याच घाईगडबडीत कुशीनगर एक्स्प्रेस मधील अतिगर्दीने एका प्रवाशाचा बळी घेतला आहे. मृत तरुणाचे नाव शादाब खान (वय 32) असे असून तो उत्तर प्रदेशातील फैजाबाद येथील रहिवासी होता.
शादाब मुंबईतील नागपाडा परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करत होता. सणानिमित्त गावी जाण्यासाठी त्याने काल रात्री लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथून कुशीनगर एक्स्प्रेस पकडली. ही गाडी कल्याण आणि आंबिवली स्थानकांदरम्यान रात्री सुमारे 1:30 वाजता पोहोचली. पण या रेल्वेत प्रचंड गर्दी असल्याने शादाबचा तोल गेला किंवा गर्दीचा धक्का बसल्याने तो चालत्या गाडीतून खाली पडला. त्यात गंभीर जखमी झालेल्या शादाबचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच कल्याण रेल्वे पोलीस घटनास्थळी धावले. त्यांनी शादाबचा मृतदेह ताब्यात घेतला आइ तो कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवण्यात आला. यानंतर मृत शादाब याच्या कुटुंबियांना आणि हॉटेल मालकाला या अपघाताची आणि त्याच्या मृत्यूची दुर्दैवी बातमी देण्यात आली.
आणखी एक जखमी
दरम्यान, याच रात्रीच्या सुमारास आंबिवलीजवळ आणखी एक प्रवासी आबिद जाफर शेख हाँ रेल्वेतून पडून जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रेल्वे पोलिसांकडून त्याच्या प्रवासाची अधिक माहिती घेतली जात आहे. या सलग दोन घटनांनी लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्या आणि सुरक्षाव्यवस्था वाढवावी, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून करण्यात येत आहे.
लोअर परेल रेल्वे स्थानकात एका 30 वर्षीय व्यक्तीचा अपघात
लोअर परेल रेल्वे स्थानकात एका 30 वर्षीय व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ती व्यक्ती रेल्वे स्थानक परिसरातच रहात होती. राहायला होता. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून प्लॅटफॉर्म क्रमांक 1 येथे ट्रॅक ओलांडताना हा अपघात घडला. 8 वाजून 50 मिनिटांच्या गोरेगाव रेल्वेची त्याला धडक बसली आणि अपघातात त्याचा मृत्यू झाला. जखमीला तात्काळ ट्रॅकमधून बाहेर काढण्यात आले, मृतदेह नायर हॉस्पिटल येथे पाठवण्यात आला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून याबद्दल अधिकचा तपास सुरू आहे.