
राज्यात पुरपरिस्थितीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. या मागणीनंतर राज्य सरकारने अडीच हजार कोटीची नुकसान भरपाईचा पहिला हप्ता जाहीर केला आहे. परंतू ही नुकसान भरपाई अपुरी असून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना त्यांचा विरोधी पक्ष नेते पदाचा कार्यकाळ आठवून पाहायलाही सांगितले आहे.
आमचे सरकार असताना आपण शेतकरी दारी आला नसतानाही त्यांना कर्जमाफी दिली होती. शेतकऱ्यांच्या या संकटावर आता शब्दाचा खेळ केला जात आहे. एखादी गोष्टी कायद्यात बसत नाही. ओला दुष्काळाची कायद्यात संज्ञा नाही, त्यामुले आता ओला दुष्काळग्रस्तांना मदत नाकारणार का असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की समजा ओला दुष्काळ हा शब्द नसेलही. पण माणसाच्या पदानुसार शब्द ही बदलतो का. माझ्याकडे तुमचे एक पत्र आहे. तत्कालीन विरोधी पक्षनेता असताना फडणवीस यांनी मला हे पत्र पाठवले होते १६ ऑक्टोबर २०२० हे पत्र दाखवत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
विविध वाहिन्यांवर शेतकऱ्यांचे दुख पाहून वेदना होत आहे, असे तत्कालिन विरोधी पक्षनेते फडणवीस म्हणाले होते. विरोधी पक्षनेते असतानाच वेदना होतात का ? मुख्यमंत्री असताना होत नाहीत का ? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. आणि ते पुढे म्हणाले की मला वेदना झाल्या होत्या. त्यामुळे मी कर्ज माफी केली होती. फडणवीस यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती असेही ते यावेळी म्हणाले.
आपण मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यासाठी कोणाचीही वाट न पाहात कर्जमाफी केली होती. देवेंद्र फडणवीस आता अजूनही अभ्यास करत आहे. प्रस्तावाचा अभ्यास सुरु आहे. केंद्राचे पथक अजून आलेले नाही. आल्यानंतर पाहणी होणार कधी ? पंचनामे होणार कधी,निदर्यीपणे कारभार सुरु असून शेतकऱ्यांची कर्जे माफ करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.