
एका शिक्षकाने प्रेमाच्या नावाखाली एकामागोमाग एक अशा तीन महिलांना फसवल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत उघडकीस आला आहे. प्रेमसंबंध, लिव्ह-इन, मूल आणि त्यानंतर धोका अशा एका वेगळ्याच ‘लव्ह ट्रॅक’वर हा शिक्षक अनेक वर्षांपासून प्रवास करत होता. राहुल तिवारी असे या आरोपी शिक्षकाचे नाव असून तो उल्हासनगरमधील एका प्रतिष्ठित शाळेत कार्यरत होता. पण पडद्यामागे त्याचे प्रेम आणि फसवणुकीचे वेगळेच धंदे सुरू होते. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
राहुल तिवारी याचे एका पीडित शिक्षिकेशी गेल्या १४ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ते दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. या संबंधातून त्यांना एक मुलगाही झाला. मात्र, मुलाचा जन्म झाल्यानंतर राहुलने तिला सोडून दिले. पहिल्या महिलेला सोडून दिल्यावर राहुलने दुसऱ्या एका तरुणीसोबत लग्न केले. परंतु, हे लग्न फार काळ टिकले नाही. मात्र, लग्नानंतर त्याने पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. ज्यामुळे ती त्याला सोडून माहेरी परतली. दुसऱ्या पत्नीने त्याला सोडल्यावर राहुलने पुन्हा तिसऱ्या एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिचीही फसवणूक केली.
यानंतर एका पीडित शिक्षिकेने याबद्दल पोलिसात तक्रार केली. या तक्रारीनंतर मानपाडा पोलिसांनी राहुल तिवारीला अटक केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. राहुल तिवारीने २०११ पासून महिलांना फसविण्याचा सिलसिला सुरू केला होता आणि त्याचा हा धंदा गेली १४ वर्षे सुरू होता. त्याने आणखी किती महिलांना अशा प्रकारे फसवले आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.
शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे डोंबिवलीसह संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका शिक्षकाकडून अशा प्रकारचे गैरकृत्य घडल्यामुळे समाजामध्ये संतापाचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणाऱ्या व्यक्तीकडून असे कृत्य होणे अत्यंत निंदनीय असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे कोणावर विश्वास ठेवायचा, असा प्रश्न समाजाला पडला आहे. पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यावर या प्रकरणातील आणखी काही बाबी समोर येण्याची शक्यता आहे.