
मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने कधी ना कधी रेल्वेन प्रवास केला असेलच. दररोज लाखो मुंबईकरांना घरातून कामासाठी इच्छिसुमत स्थळी आणि संध्याकाळी आपल्या घराकडे सुखरूपपणे पोहोचवणाऱ्या रेल्वेला ‘लाईफलाइन’ म्हणतात ते उगीचच नाही. मात्र याच रेल्वेला डागडुजीची, दुरूस्तीचीही गरज असते. त्यासाठी मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर वेळोवेळी ब्लॉकही घेतला जातो आणि दुरूस्तीची कामे पूर्ण केली जातात. त्यानंतर रेल्वे पुन्हा लाखो प्रवाशांचा भार वाहण्यास सज्ज होते.
असाच एक ब्लॉक आज मध्य रेल्वे मार्गावर घेण्यात येणार आहे, तोही मोठ्या गर्दीच्या डोंबिवली स्थानकात. त्यामुळे प्रवाशांची थोडीफार गैरसोय होऊ शकते. हा ब्लॉक कुठे, कधी आणि का घेण्यात येणार आहे, त्याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
डोंबिवली रेल्वे स्थानकात आज मध्यरात्री ‘विशेष ब्लॉक’!
रेल्वे प्रवाशांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे, कारण आज मध्यरात्री डोंबिवली रेल्वे स्थानकात ‘विशेष ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. आज (बुधवार) मध्यरात्री 12.30 ते 3.20 वाजेपर्यंत डोंबिवली रेल्वे स्थानकात नवीन 12 मीटर रुंदीच्या पादचारी पुलाचे (FOB) तुळई उभारणीचे काम होणार असून, त्याच कामासाठी विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सुमारे तीन तासांच्या या ब्लॉकच्या कालावधीमध्ये अनेक लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत होऊ शकते. तसेच तर काही गाड्या इतर मार्गावरून वळवण्यात आल्या आहेत.
गाडी क्रमांक 11020 आणि 18519 या गाड्या कल्याण-पनवेल विभागामार्गे वळवण्यात येणार आहेत. या गाड्यांना पनवेल आणि ठाणे येथे थांबा दिला जाणार आहे. तर तर गाडी क्रमांक 22104 (25 मिनिटे), 12102 (20 मिनिटे) आणि 18030 (10 मिनिटे) एवढ्या कालावधीसाठी, या गाड्या कल्याण व खडवली स्थानकांवर थांबवण्यात येतील. मध्य रेल्वे प्रशासनाने सुरक्षितता आणि पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी हे काम आवश्यक असल्याचे सांगितले असून त्यासाठी सर्व प्रवाशांनी सहकार्य करावे असे आवाहनही रेल्वे प्रशासनाकडून केले जात आहे