ट्रम्प भारताचा गळा कापत असताना मोदी गप्प का? ‘सामना’चा घणाघात

सामना अग्रलेखात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या टॅरिफ आणि त्यावर मोदी सरकारच्या मौन प्रतिक्रियेवर टीका करण्यात आली आहे. ट्रम्प यांच्या पाकिस्तानशी झालेल्या व्यापार कराराचा उल्लेख करून भारताच्या आत्मसन्मानाला झालेल्या धक्क्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

ट्रम्प भारताचा गळा कापत असताना मोदी गप्प का?  सामनाचा घणाघात
sanjay raut pm narendra modi
| Updated on: Aug 01, 2025 | 8:21 AM

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या टॅरिफ धोरणाबद्दल आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर केलेल्या टिप्पणीवर मोदी सरकारकडून कोणतेही ठोस उत्तर देण्यात आलेले नाही. ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर एकीकडे झुकणार नाही असे म्हणायचे. दुसरीकडे अमेरिकेसोबतच्या द्विपक्षीय व्यापार कराराबाबत भारत पूर्णपणे सकारात्मक आहे, अशा चिपळ्याही वाजवायच्या. मोदी सरकारची ही ताकद ट्रम्प ओळखून आहेत. म्हणूनच ते टॅरिफ लादून बुक्क्यांचा मार देत आहेत. मित्र म्हणून मोदी यांनी ट्रम्प यांच्या गळ्यात गळा घालून स्वतःला मिरवले खरे, परंतु त्यांचा हा मित्र भारताचा गळा कापत आहे. मोदी त्यांच्यासमोर एवढे हतबल का आहेत? असा घणाघात ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.

मोदी यांच्या जखमेवर मीठ चोळले

शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून ट्रम्प यांनी लागू केलेल्या टॅरिफ धोरणावर टीका करण्यात आली आहे. “अमेरिकेचे प्रे. ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्या कथित मैत्रीचे वस्त्रहरण ट्रम्प रोजच करीत आहेत. या मैत्रीची पिसे ट्रम्प यांनी काढली नाहीत असा एकही दिवस उजाडत नाही. बुधवारीही हा सिलसिला सुरूच राहिला. हिंदुस्थानातून आयात वस्तूंवर 1 ऑगस्टपासून 25 टक्के टॅरिफ लावल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आणि मोदी मैत्रीचे आणखी एक पीस उपटले. ट्रम्प एवढय़ावरच थांबले नाहीत. रशियाकडून भारताने शस्त्रास्त्रे आणि कच्चे तेल खरेदी केले याचा रागही त्यांनी भारतावर ‘दंड’ आकारण्याची घोषणा करून व्यक्त केला. एकीकडे भारतावर 25 टक्के टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्प यांनी दुसरीकडे पाकिस्तानच्या शरीफ सरकारसोबत व्यापार करार केला. पाकिस्तानातील तेलाचे साठे शोधून ते विकसित करणार असल्याची ग्वाही दिली. ‘भविष्यात कधी तरी पाकिस्तानही भारताला तेल विकेल,’ अशा शब्दांत मोदी यांच्या जखमेवर मीठ चोळले”, असे सामनामध्ये म्हटले आहे.

ते ना स्वतःच्या हाताची घडी मोडू शकले, ना तोंडाचे कुलूप सोडवू शकले

“ट्रम्प यांचा 25 टक्क्यांचा टॅरिफ बॉम्ब, त्यांनी पाकड्यांसोबत केलेले डिल, पाठोपाठ भारतीय अर्थव्यवस्थेची केलेली संभावना या सर्वच गोष्टी भारतासाठी देश म्हणून भयंकर चीड आणणाऱ्या आणि देशाच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचविणाऱ्या आहेत. त्यामुळे मोदी सरकारकडून त्यावरून तत्काळ स्पष्ट आणि सडेतोड प्रतिक्रिया व्यक्त होणे अपेक्षित होते. मात्र मोदींपासून शहा-जयशंकर यांच्यापर्यंत सगळ्यांची वाचा बसली आहे. ट्रम्प यांनी दिलेल्या आणखी एका ‘शॉक’मधून ते सावरलेले नाहीत. लोकसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेला उत्तर देतानाही मोदी ट्रम्प यांचे थेट नाव घेण्याचे धाडस दाखवू शकले नाहीत आणि ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बबाबतदेखील ते ना स्वतःच्या हाताची घडी मोडू शकले आहेत ना तोंडाचे कुलूप सोडवू शकले”, अशी टीकाही संजय राऊतांनी केली.

अरे, झुकणार नाही ना, मग तसे बेधडक सांगा

“नाही म्हणायला परराष्ट्र मंत्रालयाच्या ‘सूत्रां’च्या हवाल्याने खुलाशाचे एक पिल्लू मोदी सरकारने सोडले आहे. ‘ट्रम्प यांच्या घोषणेचा गांभीर्याने अभ्यास केला जात असून राष्ट्रीय हितांची रक्षा करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जातील. यासंदर्भात कुणाच्याही दबावाखाली झुकणार नाही,’ असे भारताने म्हणे ठणकावून सांगितले आहे. अरे, झुकणार नाही ना, मग तसे बेधडक सांगा. परराष्ट्र मंत्रालयाच्या ‘सूत्रा’मागे का लपता? पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षणमंत्री आणि परराष्ट्र मंत्री आपली तोंडे उघडायला का तयार नाहीत?” असा सवाल सामनातून करण्यात आला आहे.

मोदींकडे दुसरा पर्याय तरी कुठे?

“ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर एकीकडे झुकणार नाही असे म्हणायचे आणि दुसरीकडे ‘अमेरिकेसोबतच्या द्विपक्षीय व्यापार कराराबाबत भारत पूर्णपणे सकारात्मक आहे,’ अशा चिपळ्याही वाजवायच्या. कमरेत वाकून ‘मिलॉर्ड’ ट्रम्प प्रसन्न होतील या आशाळभूतपणे पाहायचे. मोदी सरकारची ही ‘ताकद’ प्रे. ट्रम्प पुरते ओळखून आहेत. म्हणूनच मित्रत्वाचा उल्लेख करीत ते रोज मोदी-मैत्रीची पिसे उपटत आहेत. मोदींना या मैत्रीची जागा दाखवून देत आहेत. ‘टॅरिफ लादून बुक्क्यांचा मार’ देत आहेत. तो बिनबोभाट सहन करण्याशिवाय मोदींकडे दुसरा पर्याय तरी कुठे आहे?” अशा टोलाही सामनाने लगावला आहे.