BAMU Youth Festival : दुष्काळात विद्यापीठाचा मोठा निर्णय; युवक महोत्सवात यंदा काय बदलणार? प्रमुख पाहुणे अन् तारखा जाहीर
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव यंदा साध्या पद्धतीने होणार आहे. यंदा या महोत्सवात चार जिल्ह्यांतील 668 विद्यार्थी 28 कलाप्रकार सादर करणार असून, उद्घाटनाला येणाऱ्या प्रमुख पाहुण्यांचं नावही समोर आलं आहे.

मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवात यंदा अनावश्यक झगमगाट आणि सुशोभीकरणाला फाटा देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि त्यांची कला राज्यस्तरावर पोहोचावी, या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव 5 ते 7 ऑक्टोबरदरम्यान होणार असून, प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे उद्घाटनाला विशेष उपस्थित राहणार आहेत.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील चार जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय युवक महोत्सव नुकताच पार पडला. 1 ते 12 सप्टेंबरदरम्यान झालेल्या या महोत्सवात 28 कलाप्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. जिल्हास्तरावर प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना आता विद्यापीठस्तरीय युवक महोत्सवात आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.
या महोत्सवात चार जिल्ह्यांतील 107 संघ सहभागी होणार असून, एकूण 668 विद्यार्थी कलावंत आपली कला सादर करणार आहेत. यामध्ये 343 मुली आणि 325 मुलांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांकडून एकूण 28 कलाप्रकार सादर केले जाणार आहेत. याबाबत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. संजय कवडे यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या वतीने 5 ते 7 ऑक्टोबरदरम्यान केंद्रीय युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनाला नागराज मंजुळे उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र शासनाने राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून, विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील चारही जिल्ह्यांमधील सर्व तालुक्यांचा त्यात समावेश आहे. या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण विभागाचे संचालक आणि संभाजीनगर विभागाचे सहसंचालक यांनी परिपत्रकाद्वारे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांचे परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत कळवले आहे.
विद्यार्थी विकास संचालक डॉ. कैलास अंभुरे यांनी सांगितले की, सध्या मराठवाड्यासह महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे. त्यामुळे युवक महोत्सवात पूर्वीप्रमाणे झगमगाट आणि मोठ्या प्रमाणावर सुशोभीकरण केले जाणार नाही. विद्यार्थ्यांच्या कलेला महत्त्व देत साध्या पद्धतीने महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
हा महोत्सव केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या कलागुणांची स्पर्धा आणि एक प्रकारची परीक्षा असल्याचेही डॉ. अंभुरे यांनी स्पष्ट केले. या महोत्सवात विजयी होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे राज्यस्तरावर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.