
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक (PA) अनंत गर्जेंची पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जे हिच्या आत्महत्येप्रकरणी मोठा ट्विस्ट आला आहे. गौरीच्या कुटुंबियांकडून ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही आक्रमक भूमिका घेतली होती. त्यातच आता वरळी पोलिसांनी मध्यरात्री गौरीचा पती अनंत गर्जेला अटक केली आहे. आता याप्रकरणी स्वराज्य शक्ती सेनेच्या सर्वेसर्वा आणि सामाजिक कार्यकर्त्या करुणा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
करुणा मुंडे यांनी नुकतंच टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावेळी करुणा मुंडे यांनी तीव्र प्रतिक्रिया देत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. आज महिलांच्या बाबतीत महाराष्ट्रात काय घडतंय? बीडमध्ये महिलांची परिस्थिती इतकी बिकट आहे की शाररिक, मानसिक आणि आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणावर होत आहे. तरीही शासन काही दखल घेत नाही, अशी टीका करुणा मुंडेंनी केली.
मला दोन दिवस आधी याप्रकरणी फोन आला होता. गौरी यांची ज्या दिवशी हत्या झाली आहे, त्या दिवशी मलाही रात्री १२ च्या दरम्यान फोन आला होता. मी आता बीडमध्ये आहे. त्यावेळी मला फोनवर त्यांच्या एका नातेवाईकांनी सांगितलं की पोलीस तक्रार दाखल करुन घेत नाहीत. मग तेव्हा मी सांगितलं की मला पोलिसांशी बोलणं करुन द्या, मी त्यांना तक्रार दाखल करुन घ्या असं सांगितले, अशी माहिती करुणा मुंडे यांनी दिली.
गौरी इतकी चांगली मुलगी होती. शिकलेली होती. डॉक्टर होती. ती कशाला आत्महत्या करेल. आज महिलांच्या बाबतीत महाराष्ट्रात काय घडतंय. आपण एकदम उघड्या डोळ्यांनी महाराष्ट्रात महिलांची काय अवस्था आहे. याची सखोल चौकशी व्हायला हवी. गर्जेला अटक केली आहे. यात मागे कोण कोण होते, याचीही सखोल चौकशी व्हायला हवी, असेही त्या म्हणाल्या.
संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण झाले. यात महिलांचे बळी पडत आहे. शासन, प्रशासन सर्व गप्प बसले आहेत. महिला आयोग काय करत आहे, महाराष्ट्रात काय सुरु आहे. मी याबाबतीत नि:शब्द आहे. आज बीडमध्ये महिलांची परिस्थिती इतकी बिकट आहे की शाररिक, मानसिक आणि आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणावर होत आहे. तरीही शासन काही दखल घेत नाही. ही आत्महत्या नसून हत्या आहे. माझं त्यांच्या आई-वडिलांशी बोलण झालेलं नाही. मी आज त्यांची भेट घेणार आहे, अशीही माहिती करुणा मुंडेंनी दिली.