महाराष्ट्रात भयानक जलसंकट; कोणत्या धरणात किती टक्के जलसाठा?
महाराष्ट्रातल्या अनेक भागात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागेतय. जर जूनही कोरडा केल्यास भयंकर स्थिती उद्भवण्याची चिन्हं आहेत. दुसरीकडे मराठवाड्याच्या दुष्काळासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला काही मंत्र्यांनीच दांडी मारल्यामुळेही टीका होतेय.

एकीकडे दुष्काळाच्या झळांनी लोकांचे हाल होत आहेत, आणि दुसरीकडे दुष्काळाच्याच बैठकीला ८ पैकी ५ पालकमंत्री दांडी मारत आहेत. काही परदेशात आहेत, काही परदेशाला जाण्याच्या तयारीत, तर काही मंत्री देवदर्शनाला रवाना झाले आहेत. नांदेडच्या मुखेडमध्ये पाणीटंचाईनं चाऱ्याचा तुटवडा झालाय. परिणामी दूध उत्पादन घटलंय. तर कुठे दोन हंडे भरुन पाणी मिळण्यासाठी ३-३ तास वाट पाहावी लागतेय. लातूरात पाणी टंचाईमुळे अधिकारी लोकांमध्ये संघर्ष होतोय. आधीच दुष्काळ, त्यात तापमान 43 वर, पुन्हा त्यात १२ तास लाईट गायब झाल्यानं संभाजीनगरमध्ये लोकांचा संताप उसळून आलाय.
जलाशय आटल्यामुळे त्याचा फटका मच्छिमारांना बसतोय. सुखना धरणाच्या मृतसाठ्यावर हजारो पक्षी आश्रयाला आले आहेत.सगळीकडे पाण्याचं दुर्भिक्ष असल्यामुळे पक्षी याच भागात तळ ठोकून आहेत. दुसरीकडे मोसंबीच्या बागा जळाल्यामुळे जेसीबी लावून बाग उद्धवस्त करावी लागलीय. परभणीतल्या एका गावची लोकसंख्या १२ हजार आहे. मात्र पिण्याच्या पाण्याची मदार एकाच विहिरीवर आहे.
दुष्काळानं बीडची ऐतिहासिक खजाना बावडीही आटलीय. लातूरच्या अहमदपूरमधला 12 गावांना पाणी देणाऱ्या मोघा तलावानं ३२ वर्षानंतर तळ गाठलाय. पश्चिम विदर्भात केवळ 29.73 टक्के जलसाठा शिल्लक आहे. सर्वाधिक पाणी टंचाई बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यात जाणवतेय. पुरंदर तालुक्यातलं नाझरे धरण आटलंय. धरणात पाण्याचा एक टिपूस देखील नाही. नाशिकच्या गंगापूर धरणानं तळ गाठायला सुरुवात केलीय. फक्त 25 टक्के जलसाठा उरलाय. धुळ्यातील डेडरगाव तलावात फक्त २० दिवस पुरेल इतकं पाणी उरलंय.
राज्यातील धरणं जलप्रकल्पांची अवस्था काय?
- छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरण गेल्यावर्षी याच काळात 40.56 % उपयुक्त जलसाठा होता. यंदा तो फक्त 5.42 % इतका आहे.
- संभाजीनगरमधीलच निम्न दुधना… गतवर्षी 32.29 % जलसाठा होता. यंदा 0.00 %
- नगरच्या भंडारदरामधील गतवर्षी जलसाठा होता 53.10 %, यंदा 7.76 %
- निळवंडे-2 मध्ये गतवर्षी 39.67 % साठा होता. यंदा 9.75 % आहे.
- जळगावच्या उर्ध्व तापी हातनूरमध्ये गेल्यावर्षी 52.16 % साठा होता. यंदा 30.35 % आहे.
- नाशिकच्या दारणामध्ये साठा होता 93.24 %. यंदा फक्त 24.35 %.
- ओझरखेडमध्ये गतवर्षी 26.68 % जलसाठा होता, यंदा 0.00 % आलाय.
- नीरा देवधर, गतवर्षी 22.01 %, यंदा 8.33 %
- पिंपळगाव जोगे गतवर्षी 23.03 %, यंदा 0.00 %
- सोलापूरमधील उरमोडी – गेल्यावर्षी 40.25 %, यंदा फक्त 6.06 %
मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत 8 पैकी 5 पालकमंत्री गायब
मराठवाड्यातील दुष्काळासंदर्भात मुख्यमंत्री शिंदेंनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्र्यांची ऐनवेळेस बैठक बोलावली. बुधवारी २२ तारखेला रात्री साडे ११ वाजता एसएमएसद्वारे बैठकीचे निरोप धाडले गेले. मात्र इतक्या महत्वाच्या बैठकीत मराठवाड्याचे 8 पैकी तब्बल 5 पालकमंत्री गैरहजर राहिले. धक्कादायक म्हणजे दुष्काळाच्या बैठकीला बीडचे पालकमंत्री आणि खुद्द कृषीमंत्री धनंजय मुंडेंच गैरहजर होते. माजी कृषीमंत्री आणि हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार गैरहजर. ज्या जिल्ह्यात बैठक झाली, त्याच संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे गैरहजर. त्यांच्या गैरहजेरीमागे आजारपणाचं कारण सांगितलं गेलं. जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे गैरहजर, आणि परभणीचे पालकमंत्री संजय बनसोडे गैरहजर होते.
हिंगोली जिल्ह्यात ११ लाख लोकांना दुष्काळाच्या झळा बसल्या आहेत. मात्र पालकमंत्री अब्दुल सत्तार परदेशवारीला गेले आहेत. चर्चेनुसार कृषीमंत्री धनंजय मुंडेंही परदेशात जाण्याच्या तयारीत आहेत. जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे आणि मंत्री संजय बनसोडे देखील देवदर्शनाला गेले होते. बैठकीला हजर असणाऱ्यांमध्ये मुख्यमंत्र्यांसमवेत धाराशीवचे पालकमंत्री तानाजी सावंत, नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन, जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची हजेरी होती.
शहरात १० मिनिटात ऑनलाईन ऑर्डर केल्यावर पाण्याचा जार उपलब्ध होतो. मात्र गावात पाण्यामुळे अर्थकारणाचं चक्र बिघडतं. पाणी नाही तर चारा नाही. चारा नाही तर दूध नाही, आणि दूध नाही तर इतर व्यवसायही मंद होतात. शिवाय आपलं पशूधन जगवणं हे दुष्काळातलं शेतकऱ्यापुढचं सर्वात मोठं आव्हान बनतं.
