कायद्याचा रक्षकच बनला भक्षक, दारूच्या नशेत पोलिसाचा लोकलमध्ये राडा, महिलेसोबत…

मोठी बातमी समोर येत आहे, पोलिसाने दारूच्या नशेत लोकलमध्ये गोंधळ घातला आहे, महिलांच्या डब्यात शिरून त्याने महिलांचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

कायद्याचा रक्षकच बनला भक्षक, दारूच्या नशेत पोलिसाचा लोकलमध्ये राडा, महिलेसोबत...
प्रातिनिधिक छायाचित्र
| Updated on: Aug 02, 2025 | 9:36 PM

मोठी बातमी समोर येत आहे, पश्चिम रेल्वेच्या लोकल डब्यात दारूच्या नशेत खाकी वर्दीतील पोलीसानेच महिला प्रवाशांचा विनयभंग केला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिरारोड ते नायगाव दरम्यान आज दुपारी 3 ते 3.20 च्या वेळेत लोकलमध्ये ही संतापजनक  घटना घडली आहे.

दारूच्या नशेत एक पोलीस कर्मचारी चक्क महिला डब्यात घुसला, त्याने प्रथम एका महिलेला कोपराने धक्का मारून, पुन्हा तिच्या पाठीवर हात टाकला, आणि नंतर महिलांना बसण्यासाठी असलेल्या सीटवर  बसून, महिलांशी अश्लील वर्तन केले, हद्द म्हणजे त्याने महिलांचे तिकीट देखील तपासल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या पोलिसाने लोक ट्रेनमध्ये महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यामध्ये शिरून महिलांचा व्हिडीओ देखील काढल्याचं समोर आलं आहे. अमोल किशोर सपकाळे असे या पोलिसाचे नाव असून, तो मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात कार्यरत आहे.

पीडित महिलांनी खाकीवर्दीचा मान राखून त्या दारूच्या नशेत तर्र असलेल्या पोलिसाला चोप न देता प्रथम नायगाव स्टेशन मास्तर आणि नंतर वसई लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. ज्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवतो ते पोलीसच जर लोकल ट्रेनच्या डब्यात घुसून विनयभंग करत असेल तर नोकरीसाठी घराबाहेर पडणाऱ्या आम्ही महिलांनी कोणावर विश्वास ठेवायचा? असा  संतप्त सवाल या घटनेतील पीडित महिलेनं उपस्थित केला आहे.

महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न 

लोकल ट्रेन ही मुंबईची लाईफलाईन मानली जाते, दर दिवशी लाखो प्रवाशी लोकल ट्रेननं प्रवास करतात. यामध्ये महिलांची संख्या देखील मोठ्या प्रमाणत असते. मात्र दिवसेंदिवस लोकल ट्रेनमध्ये महिलांसोबत होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. आज तर चक्क एका पोलिसानेच दारूच्या नशेत लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या डब्यात घुसून महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे आता महिलांनी कोणावर विश्वास ठेवायाच असा प्रश्न निर्माण झाला आहे. महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.