
Iran Israel War : सध्या अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाची झळ पश्चिम आशियातील देशांना बसायला सुरुवात झाली आहे. भारतात तर घरगुती आणि व्यावसायिक गॅसची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे. घरगुती गॅसची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी सरकारने एस्मा हा कायदा लागू केला आहे. विशेष म्हणजे आखाती देशातून मिळणाऱ्या कच्च्या तेलाचा आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा खंडित झाल्याने पेट्रोल, डिझेल महागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एवढेच नाही तर घरगुती गॅस सिलिंडरची किंमत तब्बल 60 रुपयांनी वाढली आहे. या युद्धाचा फटका भारतासह महाराष्ट्रातील सामान्यांना तर बसत आहेच. परंतु आता यातून धार्मिक स्थळेदेखील सुटलेली नाहीत. गॅस टंचाईमुळे राज्यातील शिर्डी, पंढरपूर यासारख्या प्रसिद्ध धार्मिक स्थळावरील अन्नछत्रांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अन्नछत्र बंद पडू नये यासाठी मंदीर प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यास सुरवात करण्यात आली आहे.
पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीच्या अन्नछत्रात सध्यातरी नियमित गॅस पुरवढा सुरू आहे. कोणतीही अडचण येणार नाही, असे मंदीर प्रशासकडून सांगण्यात आहे. अन्नछत्राच्या कामात बाधा येऊ नये यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि गॅस एजन्सी यांच्यात बैठक झाली आहे. बैठकीत अन्नछत्रात अन्न शिजवण्यासाठी गॅसची कमतरता भासू नये यासाठी काही निर्णय घेण्यात आले आहेत. भविष्यात युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसचा तुटवडा जाणवला तर अन्नछत्रात अन्न शिजवण्यासाठी पारंपरिक पद्धतीचा म्हणजेच चूल आणि डिझेल शेगडीच्या माध्यमातून अन्न शिजवले जाणार आहे. तसा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पंढरपुरात येणारा विठू भक्त उपाशी राहणार नाही. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीचे अन्नछत्र अविरत सुरू राहणार आहे, असा विश्वास मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी व्यक्त केला आहे.
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून व्यावसायिक गॅस पुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे व्यावसायिक गॅस पुरवठा बंद झाल्याचा पहिला फटका वेगवेगळ्या खाद्य स्टॉल चालकांना बसत आहे. अंबाबाई मंदीर परिसरात असे अनेक स्टॉल आहेत. परंतु या स्टॉल मालकांकडे आजच्या दिवस पुरेल इतकाच गॅससाठा शिल्लक आहे. गॅस पुरवठा होणार नसल्याने उद्यापासून टपरी आणि नाश्ता सेंटरच्या हात गाड्या बंद ठेवण्याची येणार वेळ येणार आहे. त्यामुळे अंबाबाईच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांचे हाल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
देशभरात गॅस टंचाईची शक्यता व्यक्त केली जात असताना शिर्डीतील साईबाबा संस्थानने मात्र भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी अगोदरपासूनच तयारी केली आहे. दररोज साई प्रसादालयात सरासरी दीड टन गॅसचा वापर होतो. व्यावसायिक गॅस पुरवठा बंद होण्याअगोदरच साईबाबा संस्थानने पुरेशा प्रमाणात गॅसची खरेदी करून ठेवलेली होती. शिर्डी साईबाबा संस्थानच्या साई प्रसादालयात सध्या सुमारे 20 टन गॅस साठा उपलब्ध आहे. त्यामुळे पुढील किमान 20 दिवस प्रसादालयात गॅसची कमतरता भासणार नसल्याची माहिती संस्थान प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दररोज हजारो भाविकांसाठी भोजन तयार केले जात असल्याने गॅसचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. यासोबतच संस्थानच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचादेखील मोठा उपयोग होत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून भात आणि डाळ शिजवली जात असल्याने गॅसवरील अवलंबित्व काही प्रमाणात कमी झाले असून प्रसादालयाला मोठा दिलासा मिळत आहे. सौर प्रकल्पामुळे दररोज 200 किलो गॅसची बचत होते. त्यामुळे सध्यातरी साईबाबा भक्तांची शिर्डीमध्ये गैरसोय होणार नाही, असे सांगण्यात आले आहे.