‘…तेव्हा गिरीश महाजन माझे सामान्य कार्यकर्ते होते’, खडसेंचा पुन्हा खोचक टोला

एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजप आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी महाजन यांना खोचक टोला लगावला आहे.

...तेव्हा गिरीश महाजन माझे सामान्य कार्यकर्ते होते, खडसेंचा पुन्हा खोचक टोला
| Updated on: Jun 22, 2025 | 7:06 PM

माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजप आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते पंढरपूरमध्ये बोलत होते. मी भाजपमध्ये असताना गिरीश महाजन हे माझे सामान्य कार्यकर्ते होते, असा खोचक टोला खडसे यांनी महाजन यांना लगावला आहे. तसेच त्यांनी यावेळी बोलताना भाजपवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे.

भाजपवर हल्लाबोल 

यावेळी बोलताना एकनाथ खडसे यांनी भाजपवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. पूर्वीची भाजप ही भ्रष्टाचार मुक्त आणि गुन्हेगार मुक्त अशा चौकटीतील होती, अगदी एकनाथ खडसेंवर भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यानंतर तातडीने मंत्रिपदाचा राजीनामा घेतला होता, मात्र आता जेलमध्ये जाऊन आलेले किंवा ईडी चौकशीत अडकलेले लोक पक्षात घेतले जात आहेत. अगदी दाऊदचा हस्तक असलेल्या सलीम कुत्ता याच्यासोबत नाचणाऱ्या सुधाकर बडगुजर  यांना  देखील भाजपमध्ये घेतलं आहे, हे आता अति झाले आहे, असं खडसे यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना खडसे यांनी म्हटलं की, आज भाजपमधले 90 टक्के लोक हे बाहेरचे असून त्यांच्यावर विविध आरोप आहेत.  ज्या भ्रष्ट नेत्यांच्या विरोधात मी विरोधी पक्ष नेता असताना टीका केली होती, ते आज भाजपात असून, ज्यांच्यावर सत्तर हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केले होते तेही आज याच्यासोबत आहेत, असा टोला यावेळी खडसे यांनी लगावला आहे.  भाजप हा विषय माझ्यासाठी पूर्णपणे संपला असून, मी जेव्हा अंधारात होतो तेव्हा मला साथ देणाऱ्या शरद पवार यांच्यासोबत मी राहणार आहे, असंही खडसे यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान भाजपच्या या अवस्थेला राज्याचे नेतृत्व जबाबदार आहे का? असे विचारले असता खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांना क्लीन चीट दिली आहे, यासाठी त्यांना एकट्याला दोष देणे चुकीचे आहे. प्रक्रियेत असणारे सर्व आणि पक्षात प्रवेश देणारे संघटनेचे नेते याला जबाबदार असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.