सचिन अहिर उद्धव ठाकरेंवर नाराज का झाले? एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या नेत्याने सगळं सांगितलं
naresh mhaske on sachin ahir : सचिन अहिर यांच्या शिंदेसेनेच्या एन्ट्रीवर नरेश म्हस्के यांनी भाष्य केलं. त्यांनी त्यांच्या अहिर यांच्या नाराजीवरही भाष्य केलं.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पुन्हा एकदा गळती लागली आहे. 6 खासदारांनंतर आता राज्यमंत्री राहिलेल्या आणि ठाकरेंचे विश्वासू मानल्या जाणाऱ्या सचिन अहिर यांनीच शिंदेंच्या शिवसेनेत एन्ट्री केली आहे. त्यांनी शिंदेसेनेच्या कोट्यातून उपसभापतीपदाचा अर्ज भरला आहे. एकापाठोपाठ एक नेते साथ सोडून जाऊ लागल्याने उद्धव ठाकरे यांचं टेन्शन वाढलं आहे. कामगार चळवळतील बलाढ्य नेते सचिन अहिर हे उद्धव ठाकरे यांच्यावर का नाराज झाले, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सचिन अहिर यांच्या नाराजीविषयी शिंदेंच्या जवळच्या नेत्यानं सगळं सांगितलं आहे.
सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ सोडल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना एकच उधाण आलं. अहिर यांनी शिंदेसेनेत एन्ट्री मारल्याने आदित्य ठाकरे यांनाही मोठा हादरा मानला जात आहे. सचिन अहिर यांच्यावर शिवसेना एन्ट्रीवर माध्यमांवर भाष्य करताना ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले, सचिन अहिर यांचं स्वागत करतो. कामगार चळवळतील कार्यकर्ता, विद्यार्थी चळवळीतून स्वत:चं स्थान निर्माण केलं. अशा नेत्याचं शिवसेनेत स्वागत करू. उपसभापतीपद शिवसेनेकडे आहे. शिवसेनेच्या कोट्यातून त्यांनी पद भरलाय, त्यांचं आम्ही स्वागत करू. पक्षाचा निर्णय असतो. आम्ही बेरजेचे राजकारण करत असतो. संघटनेची वाढ होणे महत्त्वाची असते. पक्षाचा निर्णय आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे पक्ष वाढवण्याचं काम करत आहेत. त्यांच्या निर्णयाचं स्वागत करतो’.
सचिन अहिर यांच्या नाराजीविषयी म्हस्के पुढे म्हणाले, ‘सचिन अहिर हे त्यांच्या नाराजीविषयी स्वत: सांगतील. परंतु उद्धव ठाकरे यांनी स्वत: आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. फक्त शिवीगाळ करणे आणि चुकीच्या पद्धतीने बोलणे, याला प्रत्येक जण घाबरत आहेत. उद्या ठाकरेंनी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला, तर नेते आणि कार्यकर्त्यांचं काय, असा आमदार, खासदार आणि नगरसेवकांवर समोर मोठा प्रश्न आहे’.
नीलम गोऱ्हेंना डावलून सचिन अहिर यांना उमेदवारी
दोन दिवसांपूर्वी उपसभापतीपदाची उमेदवारी नीलम गोऱ्हे यांना पुन्हा मिळणार असल्याची चर्चा होती. परंतु आज मंगळवारी अचानक कृपाल तुमाने यांचे नाव चर्चेत आलं. विदर्भातील कृपाल तुमाने यांनी उपसभापतीपदाची उमेदवारी मिळणार असल्याचा दावा केला होता. परंतु ऐनवेळी एकनाथ शिंदे यांचं धक्कातंत्र पाहायला मिळालं. एकनाथ शिंदेंनी ऐनवेळी ठाकरे गटातील सचिन अहिर यांना फोडत उमेदवारी दिली. सचिन अहिर यांना शिंदे गटातून उमेदवारी मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. तर नीलम गोऱ्हे यांनाही उमेदवारी डावलल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.