एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा धक्कादायक व्हिडीओ समोर? सगळंच कैद झाल्याने मोठी खळबळ!
ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगोले यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. आमदार कंत्राटदारांसोबत टक्केवारीची चर्चा करत असल्याचा इंगवले यांचा दावा आहे.

Rajesh Kshirsagar : सध्या राज्यात उद्धव ठाकरे यांच्या खासदारांनी केलेले बंड आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत केलेले पक्षांतर राज्यभरात चर्चेचा विषय आहे. पक्षातील कार्यकर्त्यांना पुन्हा बळ मिळावं यासाठी उद्धव ठाकरे बंडखोर सहा खासदारांच्या मतदारसंघात फिरत आहेत. तर दुसरीकडे आमचे ऑपरेशन टायगर यशस्वी झाले आहे, असे सांगत असतानाच लवकरच काही आमदारही आमच्या पक्षात येणार आहेत, असा दावा शिंदे यांच्या काही नेत्यांकडून केला जात आहे. असे असतानाच आता राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे आमदार राजेश क्षीरसागर यांचा हा व्हिडीओ असल्याचा दावा केला जात आहे.
व्हिडीओमध्ये नेमकं काय?
मिळालेल्या माहितीनुसार ठाकरेंच्या शिवसेनेचे सोलापूरचे माजी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या कथित व्हिडीओचा आधार घेत आमदार राजेश क्षीरसागर हे कंत्राटदारासोबत टक्केवारीची चर्चा करत असल्याचा दावा इंगवले यांनी केला आहे. व्हिडीओमध्ये कंत्राटदार तुमचे पाच टक्के आणि आणखी दोघांचे एक-एक टक्के दिल्याचे सांगत असल्याचे सांगितले जात आहे. अगोदर 40 लाख दिले. आता काम नको, असेही हा व्हिडीओमध्ये ऐकायला येत आहे. तसेच आम्हालाही वर द्यावं लागतं, असं क्षीरसागर या व्हिडीओत बोलत असल्याचे दिसत आहे.
दुसऱ्यांकडचे काम काढून आम्ही तुम्हाला दिले
व्हिडीओमध्ये कथित कंत्राटदार आणि राजेश क्षीरसागर यांच्यात चर्चा होत असल्याचे दिसत आहे. मी अमुक पैसे दिले, असं कंत्राटदार सांगण्याचा प्रयत्न करतोय. दुसऱ्यांकडचे काम काढून आम्ही तुम्हाला दिले आहे, असे क्षीरसागर बोलताना दिसत आहेत. तर साहेब राग मानू नका अशी विनंती कंत्राटदार करत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, आता या कथित व्हिडीओनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विरोधक आता हा मुद्दा लावून धरणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
(टीप- टीव्ही 9 मराठी या व्हिडीओची पुष्टी करत नाही.)