Shivsena SC Hearing : आजच्या सुनावणीआधी एकनाथ शिंदे शिवसेनेचं सूचक वक्तव्य, हे शरीर आणि आत्मा वेगळं करण्यासारखं
Shivsena SC Hearing : शिवसेना कोणाची यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीआधी एकनाथ शिंदे शिवसेनेच्यावतीने सूचक वक्तव्य आलं आहे. आज सलग दुसऱ्यादिवशी सुनावणी होणार आहे.

शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हा संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. काल सुद्धा सुनावणी पार पडली. सलग सुनावणीचा आज दुसरा दिवस आहे. सुनावणीआधी एकनाथ शिंदे शिवसेनेच्या राज्यसभेतील खासदार ज्योती वाघमारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “या आठवड्यात सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी होईल. नीरज किशन कौल आजही युक्तिवाद करतील. सत्य परेशान होता हैं लेकिन झूठ नही. विजय आमचाच होईल याचा आम्हाला विश्वास आहे. 1990 पासून निवडणूक आयोग पक्षांच्या घटनेच्या बाबत बोलत आहे. शिवसेनेची मूळ घटना उद्धव ठाकरे यांना का बदलावी लागली?” असा सवाल ज्योती वाघमारे यांनी विचारला.
“स्वतःमध्ये धाडस नाही म्हणून किचन कॅबिनेट आणि चांडाल चौकडी यांना प्रतिनिधी सभेत घेऊन बदल केले. मात्र ते बदल आयोगाला दिले नाहीत. 2022 पर्यंत हे लोक झोपले होते का? त्यांना का आपली घटना आयोगाला द्यावी वाटली नाही” असा सवाल ज्योती वाघमारे यांनी विचारला. “फूट ही फक्त विधिमंडळ पक्षात नाही तर राजकीय पक्षात देखील होती हा मुद्दा कौल यांनी मांडला आहे. शिवसेना ही मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी तयार झाली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना हरताळ हा त्यांच्या सुपुत्राने फासला. विधीमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगळे करणे म्हणजे शरीर आणि आत्मा वेगळा करण्यासारखा आहे” असं ज्योती वाघमारे म्हणाल्या.
बहीण म्हणून मनोज दादा यांना एकच विनंती
मुंबईच्या दिशेने निघालेले मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्याबाबत ज्योती वाघमारे म्हणाल्या की, “त्यांच्या बाबत सरकारने नेहमी सकारात्मक भूमिका घेतली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी आयोग स्थापन केले होते” “देणाऱ्याला शिव्या घालायच्या आणि न देणाऱ्याला काहीच नाही हे आता कुठेतरी थांबलं पाहिजे. आमचं सरकार न्याय मागण्यांसाठी सोबत नेहमी आहेच. आंदोलन करताना कायद्याचा सन्मान ठेवणं सगळ्यांचं काम आहे. बहीण म्हणून मनोज दादा यांना विनंती करते की गणेशोत्सवाची पार्श्वभूमी याला कुठेही गालबोट लागणार नाही याची काळजी घ्या” असं ज्योती वाघमारे यांनी सांगितलं.