एकनाथ शिंदेंची नवीन चाल, बोलणी यशस्वी झाली, तर जवळच्या माणसाचा पत्ता कट करुन दुसऱ्या पक्षाला विधान परिषदेची उमेदवारी

Eknath Shinde : ठाणे-पालघर पट्ट्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे यांनी नवीन राजकीय चाल खेळली आहे. यात शिवसेनेचा विस्तार आणि पक्ष बांधणी अजून भक्कम होऊ शकते. बच्चू कडू यांच्या प्रहार नंतर अजून एक राजकीय पक्ष शिवसेनेत विलीन होऊ शकतो.

एकनाथ शिंदेंची नवीन चाल, बोलणी यशस्वी झाली, तर जवळच्या माणसाचा पत्ता कट करुन दुसऱ्या पक्षाला विधान परिषदेची उमेदवारी
Eknath Shinde
| Updated on: May 26, 2026 | 9:48 AM

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सध्या पक्ष विस्तारावर लक्ष केंद्रीत केलं आहे. राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या ज्या विधान परिषदेच्या जागा आहेत, त्या माध्यमातून पक्ष विस्तार आणि बांधणी भक्कम करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. याआधी विधान परिषदेच्या दोन जागांपैकी एका जागेवर त्यांनी बच्चू कडू यांना संधी दिली. त्या बदल्यात बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाला शिवसेनेत सामावून घेतलं. प्रहार पक्षाची सामाजिक शाखा अजूनही कायम आहे. पण राजकीय पक्ष मात्र शिंदेंसोबत आहे. आता ठाणे-पालघर विधान परिषदेच्या जागेबाबतही असाच टि्वस्ट आहे. एकनाथ शिंदे एक मोठी राजकीय चाल खेळण्याच्या तयारीत आहेत. प्रहारनंतर बहुजन विकास आघाडीला शिवसेनेत सामावून घेण्याचे प्रयत्न सुरू आहे. बहुजन विकास आघाडी हा हितेंद्र ठाकूर यांनी स्थापन केलेला पक्ष आहे.

विरार, वसई, नालासोपारा, पालघर पट्ट्यात या बहुजन विकास आघाडीची ताकद आहे. भाजपच्या लाटेत वसई-विरारमध्ये बविआ समोर देखील अनेक आव्हानं निर्माण झाली आहेत. भाजपने विरार, वसई, नालासोपारा, पालघर या पट्ट्यात चांगलीच मुसंडी मारली आहे. बहुजन विकास आघाडीच्या राजकीय अस्तित्वासमोर प्रश्न निर्माण केले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आता बविआला आपल्यासोबत जोडण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. विलीनीकरणासंदर्भात एकनाथ शिंदे आणि हितेंद्र ठाकूर यांच्यात चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे.

शिंदेंच्या जवळच्या माणसाचा पत्ता कट होणार

शिवसेना-बविआ विलीनीकरण झाल्यास रवींद्र फाटक यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. ठाणे-पालघर विधानपरिषद जागेवर हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र क्षितिज ठाकूर शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असतील अशी सूत्रांची माहिती आहे. 2024 विधानसभा निवडणुकीत क्षितिज ठाकूर यांचा भाजपं उमेदवाराकडून पराभव झाला होता.

दोघांची राजकीय ताकद वाढेल

सध्याच्या राजकीय परिस्थितीत शिवसेना-बविआ एकत्र येण्यात दोघांचा फायदा आहे. त्यामुळे दोघांची राजकीय ताकद वाढेल. भविष्यात राजकीय यशाच्या शक्यता वाढतील. पण या राजकीय तडजोडीत रवींद्र फाटक यांना आमदारकीपासून वंचित रहावं लागू शकते. रवींद्र फाटक हे एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जातात. 2022 साली शिवसेनेत फूट पडली, तेव्हापासून रवींद्र फाटक हे एकनाथ शिंदेंसोबत आहेत. बविआ-शिवसेना एकत्र आल्यास एकनाथ शिंदे यांना रवींद्र फाटक यांची समजूत काढावी लागेल.

Follow Us