
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासोबत झालेल्या वादानंतर संग्रामबापू भंडारे हे चांगलेच चर्चेमध्ये आले होते, त्यांच्यावर टीका देखील झाली होती, दरम्यान त्यांनी आता पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ते जालन्यात बोलत होते. गावागावात एक लॉरेन्स बिश्नोई पाहिजे, माझा लय व्हिडिओ फिरवला की याला लॉरेन्स बिश्नोईचा का पुळका आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले भंडारे?
गावागावात एक लॉरेन्स बिश्नोई पाहिजे, माझा लय व्हिडिओ फिरवला की याला लॉरेन्स बिश्नोईचा का पुळका आहे? भारतातील एका नटाकडून हरिण मारले गेले, तेव्हा बिश्नोई समाजाने मागणी केली होती की माफी मागा. पण तेव्हा दाऊदचा काळ होता, खान कुठे माफी मागतो? परंतू बिश्नोई समाजाच्या घरामधील एक छोटं पोरगं मोठं झालं, त्याचं नाव लॉरेन्स बिश्नोई, त्याच्यावर जे गुन्हे आहेत ते काही खिसे कापणे, चाकू दाखवणे असे नाहीत. तो परदेशात फोन लावतो, कोणत्याही देशात जा, त्याचे सात -आठ कार्यकर्ते आहेतच.
त्याने खानला मेसेज टाकायची सुरुवात केली की मी तुला ठोकणार आहे, देशभर एक मेसेज निर्माण झाला की हरीण मारलं की लॉरेन्स ठोकतो. त्यामुळे देशातील हरणं सुरक्षित झाले, आता गाय वाचवण्यासाठी जी परिस्थिती निर्माण होईल, त्या परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागेल. जालन्यातील अनवा गावांमध्ये गाईची आणि देवळाची विटंबना झाली, यांच्या टारगेटवर गाई आणि देऊळ आहेत, पोलिसांनीही हिंदूच्या पाठीमागे उभा राहावं, असं संग्राम बापू भंडारे यांनी म्हटलं आहे.
गावात जय श्रीरामाच्या घोषणा दिल्या म्हणून गुन्हे दाखल झाले, तर दुसऱ्या रामाच्या घोषणा द्या ज्याने आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. देशभरातील मंदिरांना सरकारच्या वतीने कॅमेरे लावले पाहिजेत. महाराष्ट्रातील प्रत्येक नेता आपल्याला हिंदुत्ववादी, भगवाधारी बनवायचा आहे, असंही यावेळी संग्रामबापू भंडारे यांनी म्हटलं आहे. दरम्यान बाळासाहेब थोरात यांच्याशी देखील काही दिवसांपूर्वी त्यांचा चांगलाच वाद झाला होता.