दत्तकगृहातील अनाथ ते थेट महापौर, 40 वर्षांनी नेदरलँड येथील महापौर जन्मदात्री आईच्या शोधासाठी नागपूरात दाखल…

फाल्गुन महिन्यात त्यांचा जन्म झाला म्हणून अनाथाश्रमाच्या तत्कालिन अधिक्षका मंगला भुसारी यांनी त्यांचे नाव 'फाल्गुन' ठेवले होते, ही आठवण त्यांनी या भेटीत सांगितली. तेव्हा या भेटीने दोघांच्याही डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

दत्तकगृहातील अनाथ ते थेट महापौर, 40 वर्षांनी नेदरलँड येथील महापौर जन्मदात्री आईच्या शोधासाठी नागपूरात दाखल...
Falgun Binnendijk, now Mayor of Heemstede
| Updated on: Feb 07, 2026 | 6:43 PM

नागपूरच्या मातीत जन्मलेला, परंतु नियतीने अवघ्या तिसऱ्या दिवशी ज्याला अनाथ आणि पोरके केले. तोच मुलगा आज हजारो मैल दूर असलेल्या नेदरलँड्स देशातील हिमस्टेड शहराचा महापौर झाला आहे. फाल्गुन बिनेनडिक असे या व्यक्तीचे नाव असून तो आपल्या जन्मदात्री आईचा शोध घेण्यासाठी आणि आपले मूळ शोधण्यासाठी नागपूरात आला आहे. त्याची भेट त्याच्या जन्मदात्री आईशी होणार का ? असा सवाल निर्माण झाला आहे.

१० फेब्रुवारी १९८५ रोजी नागपुरात फाल्गुन यांचा जन्म झाला होता. मात्र, जन्मानंतर अवघ्या तीनच दिवसांत त्यांच्या नशिबी अनाथाचे जिणे आले. रक्ताच्या नात्यांनी साथ सोडल्यामुळे फाल्गुनला नागपुरातील एका दत्तक गृहाचा आसरा घ्यावा लागला. त्याकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हे दत्तकगृह होते, जिथे त्यांचे सुरुवातीचे पालनपोषण झाले. दत्तकगृहात सुमारे महिनाभर राहिल्यानंतर नेदरलँड्समधील एका डच दाम्पत्याने या मुलाला कायदेशीररित्या दत्तक घेण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर हा चिमुकला सातासमुद्रापार नेदरलँड्सला पोहोचला. तिथे त्याला केवळ हक्काचे घरच नव्हे तर भरभरून प्रेम करणारे आई-वडीलही मिळाले. आई-वडीलाचे प्रेम, सुरक्षितता आणि एक नवी ओळखही मिळाली. परदेशात वाढताना फाल्गुन याचे शिक्षण झाले आणि तसेच त्याने आपले कर्तृत्व सिद्ध केले. आज तोच अनाथाश्रमातील मुलगा हिमस्टेड शहराचा महापौर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. परदेशात अमाप यश, प्रतिष्ठा आणि ओळख मिळवूनही फाल्गुन यांच्या मनातील आपल्या जन्मभूमीविषयीची ओढ कधीच कमी झाली नाही.

त्यामुळे आपल्या अस्तित्वाचा शोध आणि जन्मदात्रीला एकदा तरी पाहण्याची आस फाल्गुन यांना स्वस्थ बसू देत नव्हती. याच ओढीने ते पुन्हा नागपुरात आणले. नागपुरात आल्यावर त्यांनी सर्वात आधी त्या मातेसमान व्यक्तीची भेट घेतली, ज्यांनी त्यांना तान्हुले असताना ममतेने सांभाळले होते. त्यावेळच्या अनाथाश्रमाच्या अधीक्षिका मंगला भुसारी यांची त्यांनी खास भेट घेतली. फाल्गुन महिन्यात जन्म झाला म्हणून मंगलाताईंनीच त्यांचे नाव ‘फाल्गुन’ ठेवले होते, ही आठवण त्यांनी या भेटीत उजाळली. ४१ वर्षांनंतर झालेल्या या भेटीने दोघांच्याही डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

जन्मदात्री आईच्या शोधात

फाल्गुन आजही आपल्या जन्मदात्री आईच्या शोधात आहेत. विशेष म्हणजे, ज्या आईने त्यांना तान्हे असताना सोडले, त्याबद्दल त्यांच्या मनात कोणताही राग किंवा द्वेष नाही. या भावनिक प्रवासात आता नागपूर जिल्हा प्रशासनानेही मदतीचा हात दिला आहे. नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या सूचनेनुसार जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालय आता फाल्गुन यांच्या आईचा शोध घेणार आहेत.