Nashik| ग्रीनफिल्ड महामार्ग वादाच्या भोवऱ्यात, 4 गावांचा विरोध, बागायती जमिनी जिरायती दाखवल्याचा आरोप

नाशिक जिल्ह्यातून भारतमालांतर्गत जाणाऱ्या बहुचर्चित अशा ग्रीनफिल्ड महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध सुरू झाला आहे. आडगाव, लाखलगाव, ओढा आणि विंचूर येथील शेतकऱ्यांनी या भूसंपादनाला तीव्र विरोध दर्शवला आहे.

Nashik| ग्रीनफिल्ड महामार्ग वादाच्या भोवऱ्यात, 4 गावांचा विरोध, बागायती जमिनी जिरायती दाखवल्याचा आरोप
संग्रहित छायाचित्र.


नाशिकः नाशिक जिल्ह्यातून भारतमालांतर्गत जाणाऱ्या बहुचर्चित अशा ग्रीनफिल्ड महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध सुरू झाला आहे. आडगाव, लाखलगाव, ओढा आणि विंचूर येथील शेतकऱ्यांनी या भूसंपादनाला तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यांनी आपली कैफियत शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे मांडली. सोबतच या मार्गाच्या भूसंपादनाचा मावेजा कसे देणार, याची माहिती अगोदर द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.

कसा आहे मार्ग?

नाशिक जिल्ह्यातून समृद्धी महामार्गानंतर ग्रीनफिल्ड महामार्ग जात आहे. भारतमालांतर्गत सुरत-चेन्नई हा महामार्ग आहे. जिल्ह्यातील 609 गावांमधून तो जाणार आहे. त्यासाठी 996 हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे. मात्र, या भूसंपादनाच्या मावेजाचे दर काय असतील, याची शंका आहे. कारण सध्या नाशिक जिल्ह्यात जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. हेक्टरसाठी कोट्यवधी रुपये मिळत आहेत. त्यामुळे बाजारभावानुसार सरकार पैसा देणार का, असा प्रश्न शेतकरी करत आहेत.

बागायती असताना जिरायती दाखवल्या

ग्रीनफिल्ड महामार्गात जाणाऱ्या आडगाव, लाखलगाव, ओढा आणि विंचूर या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी या बागायती आहेत. मात्र, या मार्गासाठी त्यांची नोंद करताना ती जिरायती करण्यात आल्याचा आरोप या शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे साहजिकच मोबदला मिळताना त्याचा फटका बसणार. त्यामुळे ही चूक तातडीने सुधारावी. मोबदला कोणत्या पद्धतीने देणार, त्याचे दर कसे असतील याची माहिती द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

देवस्थानांचाही विरोध

ग्रीनफिल्ड महामार्गामुळे आडगाव भागातील मनुदेवी मंदिर आणि पीर मंदिराचे विस्थापन करावे लागणार आहे. त्यामुळे या विस्थापनास मंदिर प्रशासनाने विरोध केला आहे. आहे त्याच ठिकाणी मंदिराचा पुनर्विकास करावा, अशी मागणी या देवस्थान प्रशासनाची आहे. या साऱ्या मागण्या मान्य कराव्यात असे साकडे अॅड. प्रकाश शिंदे, शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख सुनील जाधव, विनायक कांडेकर, प्रदीप कांडेकर, तानाजी जाधव आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी खासदार गोडसे यांना घातले आहे.

निवडणुकीच्या तोंडावर…

नाशिक महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होत आहे. त्यापूर्वी महापालिकेत सत्ताधारी असणाऱ्या भाजपने विविध विकासकामांचा बार उडवून दिला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गेल्याच महिन्यात दौऱ्यावर होते. त्यांनी यावेळी घोषणांची बरसात केली. याचा फायदा कुठे ना कुठे भाजपला होणारच. मात्र, आता महत्त्वकांक्षी अशा ग्रीनफिल्ड महामार्गाला विरोध होतोय. शेतकरी शिवसेना खासदारांना साकडे घालत आहेत. याचे पडसादही येणाऱ्या काळात उमटणार हे नक्की.

इतर बातम्याः

वर्चस्ववादातून रक्तचरित्र, उद्योगनगरी नाशिकमध्ये खुनामागून खून; डोक्यात दगड घालून तरुणाला संपवले

आरोग्य विज्ञान विद्यापीठाची विद्यार्थी परिषद निवडणूक बिनविरोध; अध्यक्षपदी राहुरीचा शेळके, अधिसभेवर तिघांची वर्णी

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI