रायगडमध्ये भीषण अपघात, महिलेला कारनं चिरडलं

रायगडच्या वाडंबा येथे भीषण अपघात घडला आहे, भरधाव कारनं एक महिलेला चिरडलं, या अपघातामध्ये तिचा मृत्यू झाला आहे.

रायगडमध्ये भीषण अपघात, महिलेला कारनं चिरडलं
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 05, 2025 | 6:59 PM

रायगडमध्ये भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे, या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे, तर दुसरी महिला या अपघातातून थोडक्यात बचावली आहे. म्हसळा श्रीवर्धन रस्त्यावर हा अपघात घडला आहे. या रोडवर असलेल्या वाडंबा बस स्टॉपवर भरधाव कारने एका महिलेला चिरडलं, दुसऱ्या महिलेला वाचवण्याच्या नादात हा अपघात घडला आहे. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास हा अपघात घडला आहे. किशोरी किसन जावळेकर वय 42 वर्षे राहणार केलटे असं या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, किशोरी या दोन दिवसांसाठी श्रीवर्धन येथे आपल्या माहेरी गेल्या होत्या, माहेरहून सासरी कोलटे येथे परतत असताना त्या एसटी बसने वाडंबा येथे उतरल्या,  त्याचवेळी याच स्टॉपवर आणखी एक महिला अंगणवाडी सेविका असलेल्या  प्राजक्ता प्रशांत गोगरकर या देखील उतरल्या, त्या दोघीही रस्ता ओलांडत होत्या, त्याचदरम्यान किशोरी यांना MH 03 BC 9462 या क्रमांकाची भरधाव कार आपल्या दिशेनं येताना दिसली, ही कार आपल्या सोबत असलेल्या प्राजक्ता यांना उडवणार असं लक्षात येताच त्यांनी प्राजक्ता गोगरकर यांचा हात धरून त्यांना रस्त्याच्या बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नामध्ये कारने किशोरी यांनाच धडक दिली.  किशोरी यांना कारने  चिरडलं, या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या, त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्राजक्ता या अपघातातून थोडक्यात वाचल्या आहेत.

दरम्यान किशोरी यांच्या पतीचं देखील गेल्या वर्षी निधन झालं आहे, त्यानंतर आता किशोरी यांचा या अपघातात मृत्यू झाल्यानं संपूर्ण कोलटे गावावर शोककळा पसरली आहे. ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान या प्रकरणी कारचालक आरोपी सोहम पाटील यांच्याविरोधात  म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राजक्ता गोगरकर यांना वाचवण्याचा  किशोरी यांनी प्रयत्न केला, मात्र या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर प्राजक्ता गोगरकर या थोडक्यात बचावल्या आहेत.