Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता महाप्रसाकडं; काढला तडकाफडकी थेट मोठा आदेश, …तर दाखल होणार गुन्हा
मोठी बातमी समोर येत आहे, एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता आपला मोर्चा महाप्रसादाकडे वळवला आहे. महाप्रसादासाठी नवी गाईडलाईन्स जारी करण्यात आली आहे, उल्लंघन झाल्यास आयोजकांवर थेट गुन्हा दाखल केला जाणार आहे.

काही महिन्यांपूर्वी तुकाराम मुंढे यांनी (FDA) अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्विकारला, तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचा पदभार स्विकारताच भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. राज्यभरात धडाधड धाडी पडत आहेत. अन्न पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांविरोधात तसेच एफडीएने घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई होत आहे. तुकाराम मुंढे यांच्या या कामगिरीचं राज्यभरातून कौतुक होत आहे. काही दिवसांपूर्वीच सुट्टं तेल विकणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा मुंढे यांनी दिला होता, तसेच सुट्टं तेल ग्राहकांनी खरेदी करू नये, असं आवाहानही त्यांनी केलं होतं. दरम्यान त्यानंतर आता मुंढे यांनी आपला मोर्चा हा विविध कार्यक्रमात वाटल्या जाणाऱ्या महाप्रसादाकडे वळवला आहे. एफडीएकडून महाप्रसादासाठी नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत.
निष्काळजीपणामुळे अन्नातून विषबाधेसारखे प्रकार घडू नये म्हणून एफडीए ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पहायला मिळत आहे. महाप्रसादासाठी एफडीएकडून आता कडक नियम घालण्यात आले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आयोजकांवर थेट गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. आता महाप्रसादासाठी अधिकृत परवाना किंवा नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे, विनापरवाना महाप्रसाद आयोजित केल्यास आयोजकांवर थेट गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
महाप्रसाद करत असताना स्वच्छता, मास्क, हातमोजे आणि आरओचं पाणी देणे बंधनकारक असणार आहे. अन्नाचा दर्जा, स्वच्छता राखण्यासाठी एफडीएच्या काही अटी पाळणे बंधनकारक असणार आहे. महाप्रसादाचा स्वयंपाक बनविण्यासाठी तसेच पिण्यासाठी आरओ पाण्याचा वापर करावा लागणार आहे. महाप्रसाद बनविणाऱ्या आणि वाटणाऱ्या स्वयंसेवकांना डोक्यावर टोपी घालणे बंधनकारक केले आहे. शिळे अन्न भाविकांना वाटप केल्यास आयोजकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
तसेच महाप्रसादाचे अन्न साठवण्यासाठी आणि वाटपासाठी केवळ स्टेनलेस स्टील आणि अन्नसुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षित असलेल्या भांड्याचाच वापर करावा लागणार आहे. योजकांना सोय व्हावी यासाठी एफडीएने नोंदणी प्रक्रिया अत्यंत सुलभ केली असून, अवघ्या शंभर रुपयात ऑनलाईन नोंदणी पद्धतीने परवाना प्राप्त होणार आहे.