Priya Berde: ती मराठी आहे म्हणून…परदेशात प्रिया बेर्डेंना चुकीची वागणूक मिळताच जॉनी लिव्हर संतापला, शुटच थांबवलं
Priya Berde: नुकताच अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी दिलेल्या एका मुलाखतीत विनोदी अभिनेता जॉनी लिव्हरसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. त्यांनी परदेशात शूट करत असताना जॉनी लिव्हर यांनी त्यांना पाठिंबा दिल्याचे सांगितले.

बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत ज्यामध्ये मराठी कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहेत. पण कधी कधी कलाकारांना हिंदी सिनेमात भूमिका साकारताना अनेक समस्यांना समोरे जावे लागते. कधीकधी तर त्यांना दुजाभाव सहन करावा लागतो. असाच काहीसा अनुभव अभिनेत्री प्रिया बर्डे यांना आला होता. त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये याबाबत खुलासा केला आहे.
प्रिया बेर्डे यांना ‘जान’ सिनेमात काम करताना वाईट अनुभव आला होता. या चित्रपटाचे शुटिंग हे स्वित्झर्लंडमध्ये सुरु होते. विनोदी अभिनेते जॉनी लिव्हर हे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यांनी शूटिंग थांबवले आणि सेटवरील सर्वांना चांगलेच सुनावले होते. आता नेमंक काय घडलं होतं? वाचा…
प्रिया बेर्डे स्वत:ला आलेला अनुभव सांगताना म्हटले की, “इंडस्ट्रीमध्ये प्रत्येकाच्या नावाचा एक वेगळा दबदबा असतो, त्यामुळे त्यानुसार लोक वागतात. मात्र जाणूनबुजून कोणी अॅटीट्यूड दाखवत नाही. मी सुभाष घईंचा ‘जान’ हा सिनेमा केला. त्यात अजय देवगण, ट्विंकल खन्ना, मी आणि जॉनी लिव्हर होतो. त्या सिनेमातल्या एका गाण्याचं शूटिंग स्वित्झर्लंडला करायचे होते. सुभाष घई यांच्या भावाने मला फोन करून सांगितलं की झुरिचला तुमचं तिकीट आहे, तुम्ही जेनिव्हात उतरा, तिथून लोकेशन जवळ आहे. बाकी सगळे आधीच लोकेशनला पोहोचले होते आणि माझी वाट पाहत होते. सरोज खान त्या गाण्याच्या नृत्यदिग्दर्शिका होत्या.”
“मी आणि माझी हेअरड्रेसर एअरपोर्टवर उतरलो, पण आम्हाला घ्यायला कोणीच आलेलं नव्हतं. अनोळखी शहरात काय करायचं हे कळत नव्हतं. त्यांनी फक्त शहराचं नाव आणि कोड नंबर दिला होता. तिथे भाषेचाही प्रश्न होता, कारण ती भाषा अगदी वेगळी होती. फोन करायचा झाला तरी आधी ५०० डॉलर्स भरावे लागणार होते. तेवढे पैसे माझ्याकडे नव्हते, कारण त्याकाळी जास्त मानधन मिळायचं नाही. आम्ही विचार करत तिथेच थांबलेलो असताना एक सरदारजी आला आणि म्हणाला, ‘तुम्हाला कुठे जायचं आहे? अशा एकट्याने इथे थांबू नका, कारण इथे मुलींना उचलून नेलं जातं.’ हे ऐकून माझी हेअरड्रेसर घाबरली आणि ‘आता काय करायचं, कोणी उचलून नेलं तर?’ असं बोलू लागली.”
“मी तिला धीर दिला आणि म्हणाले की काही होणार नाही, आपण काहीतरी करू. मग आम्ही हॉटेलचा नंबर शोधून सुखरूप पोहोचलो. पण तोपर्यंतचा काळ फारच भयानक होता. तोपर्यंत जॉनी भाईंनी सर्वांना सांगितलं होतं की, ‘तुम्ही तिच्यासोबत जे काही केलं ते चांगलं नाही केलं. ती येईपर्यंत मी शूटिंग करणार नाही.’ मी पोहोचल्यावर ते मला म्हणाले, ‘तुम्ही इथे आलात… तुम्हाला बरं वाटतंय का? बरं वाटत असेल तरच पुढे शूटिंग सुरू करू, नाहीतर नाही.’ मी म्हटलं की ठीक आहे, असं होत असतं, उगीच लक्ष नको देऊया.”
पुढे त्या म्हणाल्या की, “मग जॉनी भाईंनी संपूर्ण युनिटला बोलावून सांगितलं की, ‘ही मराठी अभिनेत्री आहे, महाराष्ट्रीयन आहे म्हणून तिने सर्व अॅडजस्ट करून घेतलं. जर इथे कोणती हिंदी अभिनेत्री असती तर तिने अॅडजस्ट केलं नसतं, तिने अॅटीट्यूड दाखवला असता.’ नंतर मॅनेजर येऊन मला सॉरी म्हणाला होता.” लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत प्रिया बेर्डे यांनी ही आठवण सांगितली होती.
