शरद पवारांची महायुतीत चौथा भिडू म्हणून एन्ट्री? भाजपची पहिल्यांदाच प्रतिक्रिया; मोठ्या हालचाली
शरद पवार गट NDA मध्ये सहभागी होण्यास भाजप उत्सुक असून, महायुतीत चौथा भिडू म्हणूनही त्यांना घेण्यास तयार आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा जरी पवार गटाने फेटाळली असली तरी, भाजपच्या सकारात्मक प्रतिक्रियेमुळे या चर्चांना पुन्हा बळ मिळाले आहे. विलिनीकरण झाले नाही तरी, युतीचा पर्याय खुला आहे.

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या मधल्या काळात जोरात चर्चा होत्या. शरद पवार गटाने विलिनीकरणाच्या चर्चा भलेही फेटाळून लावल्या असेल पण या चर्चांना अजून पूर्णविराम मिळालेला नाहीये. शरद पवार यांना एनडीएत घेण्यासाठी भाजप उत्सुक आहे. भाजपने पहिल्यांदाच त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विलिनीकरण होत नसेल तर चौथा भिडू म्हणूनही पवार गटाला महायुतीत घेण्यास भाजप तयार आहे. त्यामुळे शरद पवार आता काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
‘द इंडियन एक्सप्रेस’ने या बाबतचं वृत्त दिलं आहे. शरद पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादीला एनडीएत आणि महाराष्ट्रात महायुतीत चौथा सहकारी म्हणून घेण्यास भाजप तयार आहे. तसेच शरद पवार एनडीएत आणि महायुतीत आल्यास भविष्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या दिशेने हे पहिलं पाऊल असेल, असं दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटत आहे, अशी माहिती द इंडियन एक्सप्रेसने दिली आहे.
आम्ही त्यांचं स्वागतच करू
भाजपच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने नाव न छापण्याच्या अटीवर प्रतिक्रिया दिली आहे. एनडीएत जेवढे जास्त सहकारी येतील तेवढं चांगलंच आहे. शरद पवार गट कोणत्याही परिस्थितीत एनडीएत आला तर आम्ही त्यांचं स्वागतच करू. त्यांच्याशी आमचे संबंध चाांगले आहेत. दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं तर ही उत्तम गोष्ट असेल. पण सत्तेच्या भागिदारीची समस्या पाहता विलिनीकरण होत नसेल आणि पवार गट एनडीएचा आणखी एक सहकारी म्हणून येत असेल तर आम्हाला काही अडचण नाही, असं या मंत्र्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं.
पवारांनीच निर्णय घ्यावा
भाजपच्या एका पदाधिकाऱ्यानेही या मुद्द्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. केंद्र आणि राज्यात अनेक पक्षांशी आमची युती आहे. आम्हाला आघाडी सरकार चालवण्यात काहीच अडचणी नाहीत. शरद पवार यांचा पक्ष चौथा सहकारी म्हणून आमच्यासोबत येत असेल तर त्यांना महायुतीत घेण्यास काही अडचण येऊ नये. आता शरद पवार यांनाच यावर निर्णय घ्यायचा आहे, असं या पदाधिकाऱ्याने सांगितलं.
भाजपच्या नेत्याची परवानगी
दरम्यान, 28 जानेवारी रोजी एका विमान दुर्घटनेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली होती. त्यावेळी भाजपने विलिनीकरणाचं समर्थन केलं नव्हतं. मात्र. आता भाजपची संमती असल्याशिवाय विलिनीकरण न होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही राष्ट्रवादी कसे एकत्र येतील याचा विचार करण्याची भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने परवानगी दिल्याचं राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितलं. आता अंतिम निर्णय दोन्ही पक्षांनाच घ्यायचा आहे, असंही या नेत्याने सांगितलं.
शरद पवार गटातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिवाळीच्या आधी आणि दिवाळी दरम्यान राज्यातील भाजपच्या नेत्यांसोबत अनेक बैठका घेतल्या आहेत. त्यावेळी शरद पवार पुणे आणि मुंबईत रुग्णालयात अॅडमिट होते. मात्र, पवार गटाकडून सार्वजनिकरित्या विलिनीकरणाची चर्चा फेटाळल्या गेली आहे. असा कोणता प्रस्तावच आला नसल्याचं पवार गटाने म्हटलं आहे. पवार गटाच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी तर आमच्याकडे कोणताच प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे मी त्यावर टिप्पणी करणार नाही. माझा भाऊ गेला. सर्व गेलं. विषय संपला, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला होता.
दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार की नाही हे सर्वस्वी शरद पवार यांच्यावर अवलंबून आहे. दुसरीकडे, एनसीपीने 2019मध्ये एनडीएत येण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा शरद पवार यांनीच नेत्यांना रोखलं होतं, असं भाजपच्या नेत्यांचा दावा आहे.
विलिनीकरणाला अडचण कशाची?
विलिनीकरणाला भाजपाची मंजुरी असताना विलिनीकरण का होत नाहीये? असा सवाल केला जात आहे. यावर राष्ट्रवादीच्या कोणत्याही गटाने उत्तर दिलेलं नाही. कोण कुणात विलिन होणार? एनसीपीचे नाव, चिन्ह आणि सर्वाधिक आमदार सुनेत्रा पवार यांच्याकडे आहे. त्यामुळेच शरद पवार गटानेच अजितदादा गटात विलय व्हावं असं अजितदादा गटाला वाटत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
नेतृत्त्व कोण करेल?
दुसरा सवाल म्हणजे, नेतृत्त्व कोण करणार? शरद पवार गट सुनेत्रा पवार यांचं नेतृत्त्व मान्य करणार? पार्थ पवार हे दुय्यम भूमिका घेतील? विलिनीकरणानंतर सुप्रिया सुळेंचं पक्षातील स्थान काय राहील? आदी प्रश्नही दोन्ही राष्ट्रवादीसमोर आहेत.
