
नाशिक | 8 सप्टेंबर 2023 : सणासुदीचे दिवस आले असून यानिमित्ताने मिठाईची मोठ्या प्रमाणात विक्री होते. घरातही सणानिमित्तर मिठाई आणली जाते. मात्र आजका, भेसळखोरांचा सुळसुळाट वाढल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. नाशिकमध्येही या घटना वाढल्या असून त्याच पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. निकृष्ट दर्जाचे पेढे आणि मिठाई विकणाऱ्या विक्रेत्यांवर अन्न आणि औषध प्रशासनातर्फे ही कारवाई करण्यात आली आहे. येथील मलई पेढा अतिशय प्रसिद्ध आहे. मात्र काही दुकानांमध्ये मलाई पेढ्याच्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या मिठाईमध्ये मलईच नसल्याचे समोर आले आहे.
जप्त करण्यात आले भेसळयुक्त पेढे
मलई पेढ्यांमध्ये दुधापासून तयार केलेली मलई न टाकता रीच डिलाईट पदार्थापासून ही मिठाई तयार केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. असे भेसळयुक्त पेढे हे अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून जप्त करण्यात आले. दरम्यान अवघ्या काही दिवसांपूर्वीच नाशिकच्या सिन्नरमध्ये कास्टिक सोड्यापासून दूध बनवणाऱ्या कारखान्यावर नाशिक ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली होती. तर नाशिक शहरातील देवळाली कॅम्प परिसरात पनीर बनवणाऱ्या कारखान्यावरही कारवाई करून निकृष्ट दर्जाचा माल जप्त करण्यात आला होता. सणासुदीच्या काळात नाशिक जिल्ह्यात खाद्यपदार्थामध्ये भेसळ करणाऱ्यांची संख्या वाढल्याचे चित्र आहे. हे भेसळ करणारे सध्या FDA च्या रडारवर आले आहेत.