अखेर भंडारा आगीत 10 चिमुरड्यांच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल, दोन परिचारिकांवर ठपका

| Updated on: Feb 19, 2021 | 1:18 AM

10 निरागस चिमुरड्यांचा जीव घेणाऱ्या भंडारा सरकारी रुग्णालय आग प्रकरणी गुन्हा दाखल झालाय.

अखेर भंडारा आगीत 10 चिमुरड्यांच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल, दोन परिचारिकांवर ठपका
भंडारा रुग्णालयात आग, दहा बाळांचा मृत्यू
Follow us on

भंडारा : 10 निरागस चिमुरड्यांचा जीव घेणाऱ्या भंडारा सरकारी रुग्णालय आग प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. आधी अपघाती मृत्यूची नोंद करुन तपास सुरु करण्यात आला होता. आता या प्रकरणात दोन परिचारिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या दोन्ही परिचारिकांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आलाय. परिचारिका शुभांगी सातवणे आणि स्मिता आंबीलढुके असं या दोन आरोपी महिलांची नावं आहेत. राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी स्वतः याबाबत माहिती दिलीय (FIR against two nurses in Bhandara district Government hospital fire case).

भंडारा जिल्हा रुग्णालयात 9 जानेवारी रोजी मध्यरात्री लागलेल्या आगीत एकूण 10 चिमुरड्यांना आपला जीव गमवावा लागला होता. यानंतर देशभरातून प्रतिक्रिया उमटल्या होत्या. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटला आग लागल्याने ही मोठी दुर्घटना घडली होती. मध्यरात्री 2 च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज लावण्यात आला. धुरामुळे गुदमरुन या बाळांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं गेलं. (10 babies die in fire at Bhandara Government District Hospital)

नेमकं काय घडलं होतं?

शनिवारी (9 जानेवारी) मध्यरात्रीच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात धूर निघत असल्याचं पाहायला मिळालं. तेव्हा कामावर असलेल्या स्टाफने दार उघडून पाहिलं. त्यांना आतमध्ये मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचं लक्षात आलं. तेव्हा याची माहिती तातडीने वरिष्ठांना देण्यात आली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे 7 बाळांचा जीव वाचवण्यात यश आलं, मात्र 10 चिमुरड्यांचा यात मृत्यू झाला.

अग्निशमन दलाला आगीची माहिती देण्यात आल्यानंतर तातडीने मदतकार्य सुरु करण्यात आलं. रुग्णालयातील लोकांनीही यावेळी मदतकार्यात सहकार्य केलं. दरम्यान, शिशु केअर विभागातील मॉनिटर असलेले 7 बालकांना वाचवण्यात यश आलं असलं तरी आऊट बॉर्न विभागातील 10 बाळांचा मात्र मृत्यू झाला.

मुख्यमंत्र्यांना सांत्वनासाठी शब्द अपुरे

रुग्णालयाच्या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाल्यानंतर अवघ्या देशाला हुंदका अनावर झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः भंडाऱ्यात येऊन पीडित कुटुंबांची भेट घेत त्यांना धीर दिला होता. हात जोडून उभं राहण्याशिवाय मी काहीही करु शकलो नाही. त्यांचं सांत्वन करता येईल, असे शब्द माझ्याकडे नव्हते, असे उद्गार काढत मुख्यमंत्र्यांनी हतबलता व्यक्त केली होती.

अग्नितांडवाची चौकशीचे आदेश

भंडारा अग्नितांडव अर्भक मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. त्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. मुंबई अग्निशमन दलाचे निवृत्त अधिकारी प्रभात रहांगदळे या चौकशी समितीत असतील. ही दुर्घटना नेमकी कशी घडली हे शोधल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हा अपघात अचानक घडला की आणखी कोणती कारणं आहेत, हे तपासलं जाईल. घटनेच्या मुळापर्यंत जाऊन तपास केला जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले होते.

दोषींवर कारवाई करणार

भंडारा दुर्घटनेतील दोषींना सोडणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. गेलं वर्षभर आपण कोरोनाचा सामना करत होतो. त्यामुळे काही गोष्टींकडे डोळेझाक झाली का? याची चौकशी करण्यात येणार आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले होते.

सर्व रुग्णालयांचे ऑडिट करण्याचे आदेश

राज्यात पुन्हा अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर सेफ्टी ऑडिट करण्यात येणार आहे. तसे आदेशच देण्यात आले आहेत, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं.

हेही वाचा :

हात जोडून उभं राहण्याशिवाय काहीच करू शकलो नाही; भंडारा दुर्घटनेने मुख्यमंत्री भावुक

भंडाऱ्यात 10 बाळांचा जीव गेल्यानंतर सरकार जागं! सर्व रुग्णालयांचं ऑडिट करण्याचे निर्देश

भंडारा शासकीय रुग्णालयातील आगीला जबाबदार कोण? राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर मोठं प्रश्नचिन्ह

व्हिडीओ पाहा :

FIR against two nurses in Bhandara district Government hospital fire case