Bhandara Hospital Fire | भंडाऱ्यात 10 बाळांचा जीव गेल्यानंतर सरकार जागं! सर्व रुग्णालयांचं ऑडिट करण्याचे निर्देश

Bhandara Hospital Fire | भंडाऱ्यात 10 बाळांचा जीव गेल्यानंतर सरकार जागं! सर्व रुग्णालयांचं ऑडिट करण्याचे निर्देश

भंडारा जिल्हा रुग्णालयात झालेल्या बाळांच्या मृत्यूवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

सागर जोशी

|

Jan 09, 2021 | 10:19 AM


मुंबई: भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या इमारतीचं फायर ऑडिट झालं नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत 10 नवजात बाळांच्या झालेल्या मृत्यूला जबाबदार कोण? असा सवाल आता विचारला जात आहे. दरम्यान भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयात 10 बाळांचा जीव गेल्यानंतर सरकार जागं झाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, आता राज्यातील सर्व रुग्णालयांचं ऑडिट करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.(Deputy CM Ajit Pawar orders to audit all district hospitals in the state)

भंडारा जिल्हा रुग्णालयात झालेल्या बाळांच्या मृत्यूवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. ‘ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक आहे. सरकारनं याची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. या दुर्घटनेत दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसंच अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्यातील अन्य रुग्णालयातील शिशु केअर युनीटचं तातडीनं ऑडिट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत”, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि जिल्हा प्रशासनाशी आपण चर्चा केली आहे. रुग्णालयाची सेवा योग्य खबरदारी घेऊन पूर्ववत सुरु ठेवण्याचे, त्याचबरोबर अन्य बालकांवरील उपचार तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून चौकशीचे आदेश

“भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे . त्यांनी ही घटना कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री हे जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील बोलले असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत”, अशी माहिती मुख्यमंत्री सचिवालयाकडून देण्यात आली आहे.

आरोग्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा

रुग्णालयात लागलेल्या आगीत मृत्यू झालेल्या बाळांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. तसंच संध्याकाळी 5 वाजता आरोग्यमंत्री स्वत: भंडारा जिल्हा रुग्णालयाला भेट देणार आहेत. टोपे यांनी संपूर्ण घटनेची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून घेतली आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचं त्यांनी म्हटलंय. याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी चर्चा करुन अन्य बाळांना दुसरीकडे हलवण्याचे आणि लागेल ती मदत पुरवण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. या दुर्घटनेत 3 बाळांचा होरपळून तर 7 बाळांचा गुदमरुन मृत्यू झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

संबंधित बातम्या:

Bhandara Hospital Fire | “माझ्या बाळाला एकदा तरी पाहू द्या”, बाळांच्या आई आणि नातेवाईकांची आर्त हाक

Bhandara Hospital Fire | भंडारा शासकीय रुग्णालयातील आगीला जबाबदार कोण? राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर मोठं प्रश्नचिन्ह

Deputy CM Ajit Pawar orders to audit all district hospitals in the state

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें