यंदाचा उन्हाळा अत्यंत भयानक! पक्ष्यांच्या जीवावरच उठला, एकाच झाडावरचे 500 वटवघाळांचा मृत्यू
गडचिरोली जिल्ह्यात 46°C तापमानामुळे भीषण उष्णतेची लाट अनुभवायला मिळाली, ज्यामुळे एकाच झाडावरील 500 वटवाघळांचा दुर्दैवी मृत्यू झाला. महाराष्ट्रातील या विक्रमी उन्हाळ्याने मनुष्य तसेच वन्यजीवांनाही गंभीर फटका बसला असून, ही घटना हवामान बदलाच्या गंभीर परिणामांची जाणीव करून देते.

राज्यात गेल्या दोन महिन्यापासून उन्हाचा उकाडा वाढतच आहे. हा उकाडा काही केल्या थांबताना दिसत नाही. राज्यात उष्माघातामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. कालच अमरावतीत उष्माघातामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मनुष्यच नाही तर प्राणी आणि पक्ष्यांनाही या महाभयंकर उकाड्याचा त्रास जाणवत आहे. गडचिरोलीत तर भयानक उन्हामुळे एक दोन नव्हे तर 500 वटवाघळांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. एकाचवेळी एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात वटवाघळं मरण्याची देशातील ही पहिलीच घटना आहे.
गडचिरोली जिल्ह्यात तापमानात प्रचंड वाढ आली आहे. त्यामुळे गडचिरोलीत 500च्या वर वटवाघुळांचा मृत्यू झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तापमानात आठ दिवसापासून वाढ झाली असून सध्या 46 डिग्री तापमानाची नोंद गडचिरोली जिल्ह्यात झाली आहे. जंगलातील वन्य प्राणी असो की पक्षी असो सर्वांनाच तापमानाचा तडाखा सहन न करता आल्यामुळे अनेक पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.
चिंचाचं झाड…
सिरोंचा वनविभागातील परिसरात चिंचाच्या झाडावर नेहमीच वटवाघूळ वास्तव्य करीत असतात. गेल्या 20 ते 22 वर्षांपासून या चिंचाच्या झाडावर वटवाघळांचा जत्थाच मुक्कामाला असतो. त्यामुळे हे चिंचाचं झाड वटवाघुळांचा अड्डा म्हणूनही ओळखलं जातं. पण जिल्ह्यात पहिल्यांदाच या पक्ष्यांना वाढत्या तापमानाचा फटका बसला आहे. जिल्ह्यात 46 डिग्री तापमान झाल्याने वटवाघळांनाही हे तापमान सहन झालं नाही. त्यामुळेच हे पक्षी मरण पावले. एकाच वेळी 500 हून अधिक वाटवाघळं मरून पडली होती.
दुर्गंधी आली आणि…
झाडाच्या खाली वटवाघळे मृतावस्थेत पडली होती. काही वटवाघळे झाडावरच पडून होती. अचानक जंगलातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर लोकांनी पाहिल्यावर हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर काही गावकऱ्यांनी जेसीबीच्या सह्याय्याने खड्डा खोडून मरण पावलेल्या सर्व वटवाघळांना पुरून टाकलं. अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर सुरपाम यांनी दिली.
हायव्होल्टेज तापमान
दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यात हाय व्होल्टेज तापमान नोंदवले जात आहे. दुपारी 1 वाजता 46 डिग्री तापमानाची नोंद झाली. प्रचंड ऊन असल्याने राष्ट्रीय महामार्गांसह अनेक रस्ते रिकामे झाले होते. भयंकर ऊन असल्याने लोक घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. दुपारच्या एक वाजताच उन्हाचे जोरदार चटके नागरिकांना सहन करावे लागत होते. गडचिरोली जिल्ह्यातील शहरी भाग असो वा ग्रामीण भाग असो कोणत्याही ठिकाणी 46 च्यावर तापमानाची नोंद झालेली आहे.