एका मुस्लीमाच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन, गेल्या 8 वर्षांपासून होतेय गणरायाची आराधना…
मकबुल यांच्या घरातील गणरायाचं हे आगमन केवळ एका कुटुंबाचा उत्सव न राहता कोकणच्या मातीत रुजलेल्या सामाजिक सलोख्याचं आणि सर्वधर्मसमभावाचं सुंदर उदाहरण ठरतंय.

एकीकडे हिंदू आणि मुस्लीमांत दरी निर्माण होत चालली असताना एका मुस्लीमाने आपल्या घरात गणरायाची प्रतिष्ठापणा केली असेल तर ती तुम्हाला आश्चर्य वाटल्या वाचून राहणार नाही. सिंधुदुर्ग आणि गोवा बॉर्डरवरील कोरगावमध्ये एका कुटुंबाने थोडी थोडकी नव्हे तर गेली आठ वर्षे गणपती बाप्पाची आराधना केली आहे आणि आपल्या घरी गणपती बाप्पा आणत त्याची विधीवत पूजा केली आहे.
देशात धर्मा-धर्मात आता जाती-जातीत वितुष्ठ निर्माण झाले असताना एका मुस्लीमाच्या घरी गणरायाची स्थापना केली जात असल्याचे अनोखे उदाहरण समोर आले आहे. सिंधुदुर्ग आणि गोवा बॉर्डरवरील कोरगावचे रहिवासी मकबूल माळगीमनी यांच्या घरी यंदाही गणराज विराजमान झाले आहे. गेल्या आठ वर्षांपासून श्री गणरायाची भक्तीभावाने प्रतिष्ठापना केली जात आहे. बालपणी त्यांच्या घरी गणपती बसवण्याचे स्वप्न मकबुल यांनी पाहिले होते. स्वतः चं घर उभारल्यानंतर मकबुल यांनी हे स्वप्न अखेर पूर्ण केले आहे. गेल्या आठ वर्षांपासून ही परंपरा अखंड सुरू आहे.
पूजा, आरती, नैवेद्य आणि भक्तीभावाने त्यांच्या घरी गणेशोत्सव साजरा होत आहे. विशेष म्हणजे ‘माणुसकी हाच माझा धर्म… देव वेगळे असले तरी माणुसकी एकच आहे,’ अशी भावना व्यक्त करीत मकबूल माळगीमनी यांनी समाजासमोर एक वेगळाच आदर्श ठेवला आहे. त्यांच्या घरातील गणरायाचं हे आगमन केवळ एका कुटुंबाचा उत्सव न राहता कोकणच्या मातीत रुजलेल्या सामाजिक सलोख्याचं आणि सर्वधर्मसमभावाचं सुंदर उदाहरण ठरलं आहे.
एकमेकांच्या धर्माचा आदर करा…
मी लहानपणी अत्यंत गरीबी पाहिली आहे. त्यावेळी आमच्या घरात वीज नव्हती तेव्हा मी चर्चमधील मेणबत्त्यांचे मेण घरात आणून त्यापासून मेणबत्ती आणल्या आहेत. तसेच जेव्हा घरात जेवण तयार करायला शिधा नव्हता तेव्ही मी मंदिरातून आणि भंडाऱ्यातील जेवण घरी आणले आहे, त्यावेळी मला कोणी माझा धर्म आणि जात विचारली नाही. त्यामुळे लहानपणापासून गणपती बाप्पा बसवायचा होता.तेव्हा वडिलांनी मला सल्ला दिला की स्वत:चे घर घेशील तेव्हा बसव. अखेर मी माझे घर घेतल्यानंतर केवळ श्रद्धमुळे गणपती बाप्पा आणू लागलो आणि त्याची पूजा आणि आरती करु लागतो. पण सर्वांना सांगतो की माणूस आधी आला आहे नंतर धर्म आले. मी सर्वांना गणपती बसवायला सांगत नाही. मात्र, सर्वांना माझे एकच सांगणे आहे की एकमेकांच्या धर्माचा आदर करा…