तुमच्या आजोबांना विचारा…, रोहित पवारांच्या आंदोलनावरून गिरीश महाजनांचा थेट शरद पवारांवर हल्लाबोल, म्हणाले…

कर्जमाफीमधील अट रद्द करावी, यासाठी पंढरपूरमध्ये रोहित पवार यांनी अन्नत्याग आंदोलनाला सरुवात केली आहे. रोहित पवार यांच्या या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

तुमच्या आजोबांना विचारा..., रोहित पवारांच्या आंदोलनावरून गिरीश महाजनांचा थेट शरद पवारांवर हल्लाबोल, म्हणाले...
गिरीश महाजन यांची रोहित पवार यांच्यावर टीका
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 13, 2026 | 3:39 PM

सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली आहे, परंतु त्यामध्ये एक अट अशी आहे, जी रद्द करण्यात यावी यासाठी आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. सरकारने शेतकऱ्यांना सरसकट दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी केली आहे, परंतु ज्या शेतकऱ्यांचं कर्ज हे दोन लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, अशा शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना उर्रवरीत रक्कम एक रकमी भरावी लागणार आहे. ही कर्जमाफी नसून वसुली आहे, असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे, ही अट रद्द करावी यासाठी रोहित पवार हे अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. दरम्यान रोहित पवार यांच्या या आंदोलनावर टीका करताना मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले महाजन? 

रोहित पवार यांच्या आंदोलनाला कुठलाही अर्थ नाही, त्यांना फक्त टीआरपी घ्यायचा असतो आणि रोज चॅनलवर दिसायचं असतं.  आपण काहीतरी केलं याचं क्रेडिट रोहित पवार यांना घ्यायचं आहे. आपल्या घरामध्ये आजोबांना विचारा की आपलं सरकार असताना आपण काय बोंब पाडली? आंदोलनाला एकच दिवस झाला आणि ते लगेच झोपून गेले आहेत.  आम्ही देखील बारा बारा दिवस उपोषण केलं आहे. रोहित पवार यांचं नाटक लोकांना दिसत आहे, आणि समजत पण आहे. रोहित पवार यांच्या भूलथापांना लोक बळी पडणार नाहीत, असं यावेळी गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्ही कर्जमाफी प्रामाणिकपणे केलेली आहे, आणि त्याचा लाभ लोकांना मिळणार आहे. दरम्यान अजित नवले यांनी देखील रोहित पवार यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे, त्यावर देखील गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित नवले यांचा प्रत्येक आंदोलनाला पाठिंबा असतो, असं राज्यात कुठलंच आंदोलन नाही, की त्याला अजित नवले यांचा पाठिंबा नाही, असं महाजन यांनी म्हटलं आहे. दरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे.  कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने आता संपूर्ण शेतकरी हे आनंदीत आहेत,  सुखावले आहेत असंही महाजन यांनी म्हटलं आहे.

 

Follow Us