सतेज पाटलांना धक्का! महायुतीकडून गोकुळच्या अध्यक्षपदासाठी या नेत्याला संधी, पडद्यामागे घडामोडींना वेग
कोल्हापूरच्या गोकुळ महासंघाच्या अध्यक्ष पदासाठी अखेर महायुतीचा उमेदवार ठरल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणात आता एका मातब्बर नेत्याचे नाव पुढे आले आहे.

कोल्हापूरच्या गोकुळ दूध महासंघाच्या अध्यक्ष निवडीवरुन राज्यात मोठे राजकारण सुरु आहे. या गोकुळ दूध महासंघाच्या निवडणूकीत महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. सोमवारी या प्रकरणात काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी कोल्हापूरात मोर्चा काढत शक्ती प्रदर्शन केले. दरम्यान, आता महायुतीने गोकुळ महासंघाच्या अध्यक्ष पदावरुन आता आपले पत्ते उघड केल्याचे म्हटले जात आहे. यात आता गोकुळचा महायुतीचा अध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करण्यात आला आहे.
कोल्हापूरच्या गोकुळ दूधमहासंघासाठी महायुतीकडून अध्यक्ष पदासाठी अजित नरके यांच्या नावाची चर्चा असल्याचे सांगण्यात येत आहे. अजित नरके शिवसेना आमदार चंद्रदीप नरके यांचे बंधू आहेत. अध्यक्षपदाची माळ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या गळ्यात पाडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कोल्हापूरात आज सतेज पाटील यांनी मोठा संघर्ष मोर्चा काढत आपले शक्ती प्रदर्शन केले.त्यानंतर सायंकाळी महायुतीने पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी आमच्यापेक्षा केवळ एकच जास्त सदस्य त्यांचा निवडून आला आहे. मात्र त्यांनी कांगावा केला की साडेपाच लाख लोकांचा पाठिंबा आम्हाला आहे. आम्ही रस्ता आणि कोर्टातील लढाई लढू. तीन सभा तहकुब झाल्या असत्या तर प्रशासक आले असते. आणि आम्हाला हे सहज करता आले असते. संचालक नेमल्यामुळे आता २५ लोकांमधूनच अध्यक्ष होणार आहे. मविआतील लोकांनी केवळ फेक नरेटिव्ह पसरवण्याचे काम केल्याचा आरोप धनंजय महाडिक यांनी केला आहे.
सहकारात कोरम अभावी सभा होऊ शकते का? हे सगळ्यांना माहिती आहे. कोणत्याही संस्था बायलॉजच्या आधारे चालतात. मात्र शासन हे रद्द करु शकते असा फेक नरेटिव्ह सतेज पाटील यांनी पसरवला. आजच्या मोर्च्यात बाहेरचेच लोक जास्त होते असाही आरोप धनंजय महाडिक यांनी केला आहे.
निवडणूक प्रक्रियेत डेडलॉक तयार झाला होता तो सोडवण्यासाठी मुख्यमंत्री आणि सरकारने हस्तक्षेप केला. आणि आता आरोप होतोय लोकशाहीची हत्या झाली आणि काळादिवस वगैरे कांगावा केला जात आहे. सरकारला संघ ताब्यात ठेवायचा असता तर त्यावर प्रशासक ठेवला असता. परंतू सरकारने निवडणूक लावली होती. मात्र विरोधकांनी फेक नरेटिव्ह पसरवत दिशाभूल केल्याचे धनंजय महाडिक यांनी सांगितले.
कोर्टामुळे गोकूळ दूध संघाचा डी.वाय. पाटील संघ झाला नाही
सहकारी सूतगिरणी, सहकारातील जयंत पाटील वगैरे नेते आले होते. त्यांचे एवढे अज्ञान असेल का, की कोणत्याही संस्थेचा बायलॉज बदल करायचा असेल तर त्यांचे अधिकार सर्वसाधारण सभेला असतात. मुळात त्यांनी याबाबत देखील फेक नरेटिव्ह पसरवला की सरकारने बायलॉज बदलला नाही. कोर्टाच्या निकालामुळे गोकूळ दूध संघाचा डी.वाय. पाटील संघ झाला नाही असेही महाडिक यावेळी म्हणाले.